अहमदनगर : रोहित पवार इज माय लाईफ म्हणणारा सराईत गुन्हेगार गजाआड, आमदार राम शिंदे यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे (MLA Ram Shinde) यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी (Intimidation case) देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहमदनगर पथकाने अटक केली आहे. सागर गवसणे ऊर्फ सागर मराठा (Sagar Gavasane arrested) असे अटक आरोपीचे नाव आहे. सागर गवसणे याने फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.गवसणे हा राष्ट्रवादीचा समर्थक आहे.

Ahmednagar, Rohit Pawar is my life who says that he is criminal sagar Gavasane arrested, MLA Ram Shinde Intimidation case, performance of Ahmednagar local crime investigation department,

जामखेड तालुक्यातील चोंडी येथे 31 मे 2023 रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यावरून आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष तापला होता. चोंडीत होणाऱ्या या जयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व राज्यातील अनेक मोठे नेते येणार होते.चोंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता यंत्रणा सतर्क होती.

त्यातच सोहळ्याच्या दोन दिवस आधी सराईत गुन्हेगार सागर गवसणे याने जामखेडचे नगरसेवक अमित चिंतामणी यांना फोन करत तुम्ही आमदार राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घ्यायचे सांगा नाहीतर पाहून घेईन अशी धमकी दिली होती, याशिवाय फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी गवसणे याने दिली होती. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

सागर गवसणे याला उज्जैन मध्यप्रदेश येथून अटक

नगरसेवक अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला या प्रकरणी सागर गवसणे विरोधात कलम 504, 505 (2) 506 (2) नुसार जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सागर गवसणेच्या मुसक्या आवळण्यासाठी जामखेड पोलिस आणि अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक समानांतर तपास करत होते.तब्बल 15 दिवसाच्या तपासानंतर सागर गवसणे याला उज्जैन मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आले. ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली. गवसणे याच्याविरोधात 10 पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी गवसणे याला जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

फेसबुक लाईव्हमध्ये सागर गवसणे नेमका काय म्हणाला होता ?

सराईत गुन्हेगार सागर गवसणे याने 29 मे रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात गवसणे या सराईत गुन्हेगाराने आमदार प्रा.राम शिंदे यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली होती.तसेच आरोपी सागर गवसणे हा रोहित पवार इज माय लाईफ, रोहित पवार आपला जीवय असे म्हणत असल्याचे या व्हिडीओत दिसत होते. दोन राजकीय पक्षात तेढ निर्माण होईल असा मजकूर असलेला व्हिडीओ सागर गवसणे याने पोस्ट केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

आमदार प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगार सागर गवसणे याच्या मुसक्या आवळण्यासाठी मागावर असलेल्या एलसीबीला मोठे यश मिळाले.एलसीबीने सागर गवसणे याला मध्यप्रदेशातून अटक केली.ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, राम माळी, रविंद्र कर्डिले, पोलिस नाईक सचिन अडबल, प्रशांत राठोड, राहूल गुट्टू , मेघराज कोल्हे सह आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.