अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 50 हजार घरकुले पूर्ण, राज्यात अहमदनगर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चौथा क्रमांक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । अहमदनगर  जिल्ह्यामध्ये मागील वर्षी महा आवास अभियान ग्रामीणचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. या अभियानामध्ये अहमदनगर जिल्ह्यात 80 टक्के कामे पूर्ण झाली असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 47 हजार 674 लाभार्थ्यांपैकी 41 हजार 932 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे.

राज्य पुरस्कृत योजनेत 28 हजार 551 पैकी सर्व लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे  राज्यात अहमदनगर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चौथा क्रमांक तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. अशी माहिती राज्याचे ग्रामविकास, कामगारमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे  दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महा आवास अभियान ग्रामीण दुसरा टप्पा राबविण्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

या कार्यशाळेत दूरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, आ. बबनराव पाचपुते, आ. लहू कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषदेचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनिल पठारे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षी आपण 5 लाख घरकुले पूर्ण करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी जवळपास 3 लाख 50 हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. आता दुस-या टप्प्यात अशीच जलदगतीने कामे होऊन गोरगरीबांना घरकुल उपलब्ध करुन देण्यात यावे. 31 मार्च 2022 पर्यंत हा दुसरा टप्पा पूर्ण झाला पाहिजे. अशा सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

संबंधित अधिका-यांनी मनापासून काम केल्यास गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल व त्यांचा आशीर्वाद मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा परिषेदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाआवास अभियानाबाबतची माहिती दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक सुनिल पठारे यांनी महाआवास अभियान ग्रामीण दुस-या टप्प्या‍बाबत नियोजनाचे सादरीकरण केले.