11 वर्षानंतर जामखेड आयटीआयमधील वसतिगृहाचा होणार कायापालट !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड येथील आयटीआयमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती, गेल्या 11 वर्षांपासून हस्तांतरणाचा प्रश्न रखडला होता. हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. त्यामुळे या वर्षी किंवा पुढच्या वर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात राहता येणार आहे. (After 11 years, the hostel in Jamkhed ITI will be transformed)

जामखेड आयटीआय या संस्थेत विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी 2010 साली वसतिगृह बांधण्यात आले होते.परंतू निव्वळ हस्तांतराची प्रक्रिया राबवली न गेल्याने विद्यार्थ्यांना वसतिगृह वापरता येत नव्हते.विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने रोज ग्रामीण भागातून ये-जा करून शिक्षण घ्यावे लागत होते.जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत त्यांना जामखेड शहरात भाड्याची खोली घेऊन रहावे लागत असायचे. जामखेड शहरापासून आयटीआय लांब असल्याने विद्यार्थ्यांना रोज चालत आयटीआय ला यावे लागायचे.

जामखेड आयटीआयमधील वसतिगृहाचे बांधकाम होऊनही ते तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दहा अकरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना वापरता येत नसल्याची बाब आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी आयटीआय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक बैठका घेतल्या. वसतिगृह बांधकाम जूने झाल्याने किरकोळ दुरूस्ती आवश्यक होती. यासाठी 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

वसतिगृहाची किरकोळ दुरुस्ती झाल्यानंतर वसतिगृहाचे हस्तांतरण जामखेडच्या सार्वजनिक बांधकाम  विभागाकडू जामखेड आयटीआय प्रशासनास हस्तांतरण होणार आहे. यामुळे लवकरच जामखेड आयटीआयचा कायापालट होणार आहे. परगावच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पियाजियो करणार संस्थात्मक व्यवस्थापन

जामखेड आयटीआयचे संस्थात्मक व्यवस्थापन समितीची जबाबदारी ही पियाजियो कंपनीला देण्यात आली आहे, तसेच कर्जत आयटीआयच्या व्यवस्थापन समितीची जबाबदारी ही भारत फोर्ज या कंपनीला देण्यात आली आहे. आयटीआयमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या कंपन्या कार्यरत असतील.