महाराष्ट्रात गुरुवारी आढळले 46 हजार नवे कोरोना रुग्ण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा महाउद्रेक सुरू असल्याने राज्यात नाईट कर्फ्यू लागू आहे. गुरुवारी कोरोनाने सर्वात मोठा दणका दिला आहे. दिवसभरात एकुण 46 हजार 406 रूग्णांचे निदान झाले. (46,000 new corona patients found in Maharashtra on Thursday)

राज्यात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. ज्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती गेल्या काही दिवसांपासून देशात आणि जगभर आहे तो ओमिक्रॉन महाराष्ट्रात मात्र संथ झाला आहे. राज्यात आजवर 1367 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 775 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. सध्या सक्रीय रूग्णांची संख्या 589 इतकी आहे.राज्यात गुरुवारी एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळून आला नाही.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन थंडावलेला असतानाच नियमित कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊ लागली आहे. राज्यात दररोज 25 हजाराहून रूग्ण आढळून येऊ लागले आहेत. राज्यात सध्या 4000 ते 500 मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज लागत आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाने अक्षरशा: धुमाकुळ घातला असून दिवसभरात तब्बल 46 हजार 406 इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही आजवरची  एकाच दिवसातील सर्वात मोठी रूग्ण संख्या आहेत.

राज्यात सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 2 लाख 52 हजार 828 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गुरुवारी 34 हजार 658 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 36 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू दर वाढू लागल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत.

राज्यात गुरुवारी अखेर 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 9 हजार 124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के इतके आहे. तर मृत्यू दर 2 टक्के आहे. राज्यात आज अखेर 66 लाख 83 हजार 769 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील मोठ्या शहरात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत असतानाच आता ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाबाधित रूग्ण वाढू लागले आहेत. आज दिवसभरात 557 नवे रूग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या आता 2 हजार 482 इतकी झाल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढल्या आहेत.