राज्यात पुढील 04 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या बिहारच्या उत्तर पश्‍चिमी भागात व परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. (Warning of torrential rains in sparse places in the state for the next four days)

राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. दरम्यान पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही दिवसात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शाहीन हे चक्रीवादळ निवळल्यानंतर मंगळवारपासून (ता. ५) देशाच्या वायव्य भागात वाऱ्याची दिशा बदलणार. तसेच आर्द्रतेची टक्केवारी ही कमी होईल. परिणामी या भागात मुख्यतः कोरडे हवामान होत असल्याने बुधवारपासून (ता. ६) मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ‘शाहीन’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. तर या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताच धोका निर्माण होणार नाही. या चक्रीवादळाचा प्रवास पाकिस्तान, मकरान किनाऱ्याकडे होत आहे. त्यानंतर चक्रीवादळाची दिशा बदलून त्याचा प्रवास ओमानकडे होणार आहे. त्यामुळे ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर सरकणार. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ हे अरबी समुद्रात गेल्यानंतर त्याचे पुन्हा चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.