जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेना फुटीनंतर सेना कमजोर झाल्याचे चित्र रंगवले जात असताना शिवसेनेला पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते प्रवेश करत आहेत. उध्दव ठाकरे आता थेट भाजपलाच मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
उध्दव ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांना सह देण्यासाठी थेट भाजपाची मोठा नेता शिवसेनेत आणण्यासाठी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. भाजपा नेते माजी आमदार संजय देशमुख हे येत्या 20 रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माजी आमदार संजय देशमुख यांचा सेनेत प्रवेश झाल्यास ठाकरे गटाकडून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साधला जाणार आहे. एकिकडे भाजपला धक्का असणार आहे तर दुसरीकडे संजय राठोड यांच्यासाठी मोठे अव्हान असणार आहे.
माजी आमदार असलेले संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. 1999 ते 2004 या काळात देशमुख हे दिग्रस मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.1999 मध्ये ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. याच निवडणूकीत त्यांनी बंडखोरी करत विजय मिळवला होता. 2019 साली दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एकत्र झाल्यानंतर देशमुख यांचा राठोड यांनी पराभव केला होता. देशमुख यांनी 75 हजार मते घेतली होती.
राठोड आणि देशमुख यांच्यातील संघर्ष कायम चर्चेत असता. माजी आमदार संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास संजय राठोड यांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या राज्यात उध्दव ठाकरे गटाला मोठी सहानुभूती मिळत आहे. याच लाटेवर स्वार होऊन देशमुख हे राठोड यांना धुळ चारू शकतात असा कयास बांधला जात आहे.