एकनाथ शिंदे गटाने दिले हे तीन पर्याय, ठाकरे-शिंदे गटाने नाव आणि चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवला, इतकी नावं आणि चिन्हं समान !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा नवा अध्याय सध्या महाराष्ट्रात लिहिला जात आहे. शिवसेना या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे – ठाकरे वादाच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याबरोबरच शिवसेना नाव वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घातली आहे. यामुळे दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे आज आपापली तीन-तीन नावे सोपविले आहेत.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकदा शिंदे यांच्या गटांमध्ये सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात वाद सुरू आहे .दोन्ही गटांनी शिवसेनेवर दावा केल्याने निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्यास दोन्ही गटांना तात्पुरती बंदी घातली.
ठाकरे गटाकडून चिन्ह आणि नाव याबाबतचे पर्याय उध्दव ठाकरे यांनी काल जाहिर केले होते. शिंदे गटाकडून कोणती नावे दिली जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली होती. आज दुपारपर्यंत अनेक नावांची चर्चा माध्यमांत सुरू होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटासाठीची संभाव्य तीन नावे निवडणूक आयोगाला सोपवल्यानंतर नावांबाबतचा सस्पेन्स उठला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे गटाकडून आज दुपारी एक वाजता नाव चिन्हांची यादी सादर करण्यात आली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून निवडणूक आयोगाकडे दिले आहेत. तर ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे समान नाव दिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नाव दोन्ही गटांना मिळू शकणार नाही.
त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल हे चिन्ह ठाकरे गटाने सुचवले आहेत तर शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशुल आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे. यातही दोन्ही गटांकडून दोन चिन्ह समान आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला गदा हे चिन्ह मिळू शकते. निवडणूक आयोगाकडून काय निर्णय घेतला जाणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.