जामखेड तालुक्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रेल्वे प्रवासाचा आनंददायी थरार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। गेल्या अनेक वर्षांपासून बीड व अहमदनगर दक्षिणेतील जामखेडमधून रेल्वे धावावी असे स्वप्न या भागातील जनतेने पाहिले.या स्वप्नाची पुर्ती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी ते अहमदनगर ही रेल्वे सेवा नुकतीच सुरु झाली आहे. झुक झुक आगीन गाडी.. धुरांच्या रेषा हवेत काढी हे गीत कायमच चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आलेले आहे. जामखेड तालुक्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना एका शाळेने रेल्वे प्रवासाची अविस्मरणीय अशी आनंददायी थरारक सफर आज घडवून आणली.

students of Malai Vasti School in Jamkhed taluka experienced the thrill of New Ashti to Solapurwadi railway journey

नुकतीच आष्टी – अहमदनगर ही रेल्वे सेवा सुरु झाली आहे. या सेवेला नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याच्या बातम्या काही दिवसांपुर्वी आल्या होत्या. या मार्गावर प्रवाश्यांची जास्त गर्दी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना रेल्वेची आनंददायी सफर घडवून आणण्याची हीच सुवर्णसंधी साधत जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील मळईवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आज 7 रोजी आपल्या विद्यार्थ्यांना न्यू आष्टी रेल्वे स्टेशन ते सोलापूरवाडी रेल्वे स्टेशन अशी थरारक आणि उत्साहवर्धक अशी अविस्मरणीय रेल्वे सफर घडवून आणली.

  • मळईवस्ती प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना रेल्वेची सफर घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापक प्रविण शिंदे, शिक्षक महादेव हजारे, अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे, लहू शिंदे व उद्योजक अमोल निगुडे यांनी पुढाकार घेतला होता. रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे खाऊ वाटप करण्यात आले. रेल्वेत पहिल्यांदा प्रवास करायला मिळणार याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरून ओसांडून वाहत होता.
students of Malai Vasti School in Jamkhed taluka experienced the thrill of New Ashti to Solapurwadi railway journey

दरम्यान, रेल्वेत बसल्यानंतर बालगोपालांनी एकच जल्लोष केला. 23 विद्यार्थ्यांना रेल्वेची सफर घडवून आणण्यात आली. या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच पालक व दोन शिक्षक होते. या सर्वांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची अनोखी सफर घडवून आणली. संपुर्ण प्रवासात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचलेला होता.

  • गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षण अधिकारी कैलास खैरे, केंद्रप्रमुख सुरेश कुंभार यांनी रेल्वेत प्रवास करत असलेल्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहुन सर्वच जण भारावून गेले होते.

दरम्यान, सोलापुरवाडी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने एका निसर्ग पर्यटन केंद्रावर नेण्यात आले. त्या ठिकाणी एडवेंचर गेम्स, जॉय राईड, कॅमल राईड, मनोरंजक खेळणी, रेन डान्स, वॉटर पार्क, D.J. डान्स चा मनोरंजक अनुभव देण्यात आला. मुलांनी या सर्वांचा खूप आनंद घेतला. एका दिवसाच्या या अनोख्या सहलीचा अनुभव घेत विद्यार्थी मोठ्या उत्साहात घरी परतले.

  • मळईवस्ती प्राथमिक शाळेची अनोखी सहल यशस्वी करण्यासाठी सरपंच अंकुश शिंदे, अमोल नीगुडे, विशाल राऊत, पोपट शेंडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अप्पासाहेब राऊत, लहू शिंदे, मुख्याध्यापक प्रविण शिंदे, शिक्षक महादेव हजारे यांनी विशेष मेहनत घेतली.
students of Malai Vasti School in Jamkhed taluka experienced the thrill of New Ashti to Solapurwadi railway journey

मुलांना आनंद मिळवून देण्यासाठी सरपंच अंकुश शिंदे आणि लहू शिंदे या शिंदे बंधूंनी आजच्या सहलीची केवळ संकल्पनाच नाही तर मुलांच्या आनंदासाठी त्यांनी जास्तीत जास्त आर्थिक भार उचलला होता.या सहलीत स्वतः लहू शिंदे हे सहभागी झाले होते. त्यांनी मुलांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद दिला. मुलांना सहलीचा आनंद अधिकाधिक द्विगुणित करण्यासाठी लहू शिंदे यांनी घेतलेला पुढाकार मळईवस्ती शाळेतील लेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.