जामखेड शेजारील ‘या’ तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : कर्जत- जामखेड – आष्टी – पाटोदा या चार तालुक्यात मागील काही वर्षांपासून बिबट्या सक्रीय आहे. सातत्याने या भागात बिबट्या दर्शन होत आहे. काही महिन्यांपूर्वी जामखेड तालुक्यातील धामणगाव वनहद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. आता जामखेड शेजारील पाटोदा तालुक्यात बिबट्या सक्रीय झाला झाला असल्याचे उघडकीस आले आहे.

Farmer injured in leopard attack in Patoda taluka near Jamkhed

आज सात रोजी एका वृध्द शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना पाटोदा तालुक्यात घडली आहे. या घटनेत आण्णासाहेब दत्तु काकडे हा वृध्द शेतकरी जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथील शेतकरी आण्णासाहेब दत्तु काकडे हे जनावरांना चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.

यावेळी काकडे यांनी जोरात आरडाओरड केल्याने, शेजारी चरत असलेली जनावरे काकडे यांच्या दिशेने धावली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. जनावरांच्या सतर्कतेमुळे काकडे यांचे प्राण वाचले. बिबट्याच्या हल्ल्यात काकडे हे जखमी झाले आहेत.

घटनेनंतर काकडे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पाटोदा तालुका हादरून गेला आहे. शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेबाबत वनविभागाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.