विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची रविवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून राहूल नार्वेकर हे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले, आता राज्यात भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. नव्या सरकारचा विश्वास दर्शक ठराव सोमवारी होणार आहे. त्याआधी रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष होताना दिसणार आहे.

भाजपने राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधान भवनात जाऊन आमदार राजन साळवी यांचा विधानसभा अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेनेचे सुनील प्रभू, अरविंद सावंत सह आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला, 3 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यापूर्वी काँग्रेसने संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित केले होते, परंतु सेनेने काँग्रेसला सेनेचा उमेदवार उभा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली त्यानंतर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.