महाराष्ट्रात शिंदेशाही : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही शपथ घेतली.

राजभवनात आज सायंकाळी पार पडलेल्या शपथविधी समारोहात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दवा केला. त्यानंतर सायंकाळी राजभवनमध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री भागवत कराड कपिल पाटील खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सह भाजपचे पदाधिकारी आणि नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान आज दुपारी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे गोव्यावरून मुंबईला दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भामध्ये चर्चा झाली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळासमवेत एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भावनात जाऊन सत्ता स्थापनेचा दवा केला होता.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली होती, त्याचबरोबर सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही अशीही घोषणा केली होती. देवेंद्र फडवणीस यांच्या घोषणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता.

देवेंद्र फडवणीस यांच्या या निर्णयामुळे केंद्रीय नेतृत्वामध्ये नाराजी पसरली होती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सूत्रे हलवून देवेंद्र फडणवीस यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.