जेष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन | Senior literary and social activist Anil Avchat passes away

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं दीर्घ आजाराने पुण्यात निधन झालं. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Senior literary and social activist Anil Avchat passes away)

डाॅ अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती.

पेशाने डॉक्टर असलेल्या अनिल अवचट यांनी समाजसेवेत मोलाचं योगदान दिलं. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.

डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी राहिले. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

डाॅ अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते.त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं. त्यांच्या निधनामुळे साहित्य व सामाजिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.