राम शिंदे आणि रोहित पवार अधिवेशनात एकाच मुद्द्यावर आक्रमक, नागेश पवार मृत्यू प्रकरणात सरकारकडे केली महत्वाची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । नागेश पवार या तरूणाच्या मृत्यूचा मुद्दा बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांनी याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शिंदे – पवार हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. या संघर्षामुळे हा मतदारसंघ सातत्याने चर्चेत असतो. परंतू आता संघर्षा ऐवजी एका वेगळ्या कारणाने मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे.

Ram Shinde and Rohit Pawar aggressive on the same issue, Nagesh Pawar death case made an important demand to the government

जामखेड शहरातील नागेश पवार या तरूणाचा पोलिसांच्या मारहाणीत पुण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा मुद्दा विधानसभा आणि विधानपरिषदेत बुधवारी गाजला. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत तर आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत या मुद्द्यावरून सभागृहाचे लक्ष वेधले आणि सरकारने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी सभागृहात केली.

दरम्यान पावसाळी अधिवेशनात बुधवारचा दिवस गाजला तो आमदारांच्या राड्याने. सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडल्याने विधानभवनात मोठा गोंधळ उडाला होता. या राड्यानंतर सभागृहात बुधवार दिवस गाजला तो भाजपा आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांनी एकाच मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने. ऐरवी कडवे विरोधक असलेल्या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघातील एका मुद्दावर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले.

काय आहे नेमकं प्रकरण ?

जामखेड शहरातील नागेश रामदास पवार हा 27 वर्षीय युवक गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हडपसर भागात राहण्यास होता. तो विविध चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी होता. त्याला पुणे रेल्वे पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. 17 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 ऑगस्ट पर्यंत पवार याला पोलिस कोठडी सुनावली होती.

कोठडीत असताना त्याला मारहाण झाली, याच दरम्यान तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

नातेवाईकांचे म्हणणे काय ?

नागेश पवार यांच्या मृत्यूनंतर वातावरण तापले आहे. नागेशचा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा आरोप मयत नागेशची पत्नी आणि बहिणीने पोलिसांवर केला आहे. दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच जामखेडमधील मयत पवार याच्या समाजबांधवांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन सदर घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.

आमदार रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले ?

चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या जामखेडमधील नागेश पवार या तरुणाचा पुण्यात रेल्वे पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली या गंभीर घटनेकडं सरकारचं लक्ष वेधले. दोषी पोलिसांवर कारवाई करावी आणि मयत तरुणाच्या कुटुंबाला मदत करण्यात यावी अशी मागणी आमदार रोहित दादा पवार यांनी विधानसभेत बोलताना केली.

आमदार राम शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले ?

नागेश पवार या तरूणाच्या मृत्यूबाबत आमदार राम शिंदे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला. नागेश पवार या तरुणाचा पुणे रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शिंदे पुढे म्हणाले की, पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यानेच नागेश पवारचा मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकरणाची सरकारने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली.

या प्रकरणावर पोलिसांचे म्हणणे काय ?

मृत नागेश पवार हा चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर 20 ऑगस्ट रोजी त्याला थंडी, ताप आला. यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याला फिट येऊन उलटी झाली. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाल्याचे सांगितल्यावर आम्ही आयसीयुमध्ये दाखल करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. याचदरम्यान, न्यायालयाने ऑनलाइनच्या माध्यमांतून त्याला पोलिसांनी मारहाण केली का, असे विचारले होते. त्यावेळी मृत आरोपीने नाही, असे सांगितले होते. 

तो कोठडीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. तसेच इन कॅमेरा पंचनामा केला असता देखील त्यावर मारहाणीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. म्हणून आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. उलट आम्ही माणुसकी दाखवत त्याच्यावर सर्वोतपरी उपचार केले, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी दिली.