जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात टीका टिप्पणीचा स्तर ढासळत आहे. राजकीय नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ऐकमेकांविरोधात गरळ ओकत आहेत. नुसती टीका करण्यापुरती राजकीय लढाई राहिलेली नाही. काही वेळा हिंसेचाही वापर होतो. अशीच घटना कोकणातून समोर आली आहे. कोकण आणि राडा या समिकरणाची पुन्हा उजळणी होते की काय असेच चित्र आता निर्माण झाले आहे.

कोकणात राणे विरूद्ध हा वाद तसा नवा नाही. या संघर्षांतून अनेकदा संघर्ष उडाल्याच्या घटना घडल्या आहेत.आता उध्दव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोन पक्षांमधला वाद थेट घरावर हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याने हा विषय चिंतेचा बनला आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री काही अज्ञात हल्लेखोरांकडून दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर लाकडी दांडे असलेेेले स्टंम्प, तसेच पेट्रोलच्या पाठल्या फेकण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ही घटना चिपळूण शहरात घडली. या घटनेमुळे कोकणात खळबळ उडाली आहे.
जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घटना कोणी घडवून आणली ? हल्लेखोर कोण होते. याचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत. जाधव यांच्या घराभोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर कठोर शब्दांत टीका केली होती. या टीकेनंतरच जाधव याच्या घरावर हल्ला होण्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेत राणेंचा तर हात नाही ना ? अशी चर्चा आता महाराष्ट्रात सुरु झाली आहे.