Pune Ring Road Land Acquisition Process Starts : 25% more compensation for self-donating land for land acquisition
पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रिया सुरू, भूसंपादनासाठी स्वता:हून जमीन देणाऱ्यांना 25% अधिकचा मोबदला मिळणार
पुणे : 6 जूलै 2023 : पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांचा वाहतुक कोंडीतून श्वास मोकळा करण्यासाठी शासनाने 172 किलोमीटर लांबीचा पुणे रिंग रोड हा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलीय.
जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्प बाधितांना नोटीसा बजावण्यास सुरुवात झालीय.नोटीस मिळताच भूसंपादनासाठी स्वता:हून जमीन देणाऱ्यांना 25% अधिकचा मोबदला दिला जाणार आहे.असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड या दोन मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे समस्या गंभीर बनली आहे.या वाहतूक कोंडीच्या समस्येतून दोन्ही शहरांची सुटका करण्यासाठी सरकारने पुणे रिंग रोड हा प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 172 किलोमीटर लांबीचा हा पुणे रिंग रोड असणार आहे. त्याची रुंदी 110 मीटर असणार आहे. हा संपूर्ण रस्ता वर्तुळाकार असणार आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहे.
पुणे रिंग रोड प्रकल्पात पूर्व भागातील मावळ मधील 11 खेडमधील 12 हवेलीतील 15 भोरमधील 03 तर पुरंदर मधील 05 अशा 46 गावांमधील जमिनींचे संपादन होणार आहे. तर पश्चिम भागातील भोरमधील 05 हवेलीतील 11 मावळातील 06 आणि मुळशीतील 15 अश्या 37 गावांमधील जमीन संपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी एकूण 695 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. मावळ आणि मुळशी या दोन तालुक्यातील 26 गावांच्या जमिनीचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे.हे मूल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना विचारात घेऊन ते पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणाऱ्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मूल्याकंन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील भूसंपादन सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली होती.
दरम्यान, भूसंपादन नोटीस प्राप्त झाल्यानंतर स्वत:हून जमीन देणाऱ्यांना मोबदल्याची २५ टक्के रक्कम अधिक देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बांधितांनी मुदतीत संमतिपत्र द्यावीत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर पश्चिम भागातील रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रकिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे या नोटीसा देण्यात आल्या अहेत, अशी माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.
पुणे रिंग रोड संदर्भात थोडक्यात माहिती
पुणे रिंग रोड हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिशय कारगर राहणार आहे. हा वर्तुळाकार रस्ता 172 किमीचा असूनही एकूण दोन विभागात विभागला गेला आहे. 110 मीटर रुंदीचा हा रस्ता पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात विभागून याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. पुणे वर्तुळाकार रस्त्यात पूर्व विभागामध्ये मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश आहे. तसेच रस्त्यांच्या पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांचा समावेश आहे. म्हणजे एकूण 83 गावातून या प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.
दरम्यान आता भूसंपादनासाठी आवश्यक जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मुळशी आणि मावळ तालुक्याच्या 26 गावांसाठी मूल्यांकन निश्चित झाले आहे. आता त्या ठिकाणी जमीन संपादित केली जाणार आहे.बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून पाचपट मावेजा दिला जाणार आहे.पुणे रिंग रोड प्रकल्प 22 हजार कोटी खर्चून तयार केला जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक पैशांची उभारणी करण्याकरता हुडकोकडून 11,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं आहे.
या गावामधुन जाणार पुणे रिंग रोड
खेड तालुक्याच्या खालुंब्रे, निघोजे, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, मोई, चन्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव या गावातून हा रोड प्रस्तावित आहे.
मावळ तालुक्याच्या परंदवडी, उसे, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे , आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे या गावातून हा रोड बांधला जाणार आहे.
भोर तालुक्यात हा रोड कमी प्रमाणात राहणार आहे. तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे या गावात हा रस्ता जाणार आहे.
हवेली तालुक्यात तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मुळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची या गावात पुणे रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यात दिवे, सोनोरी, चांबळी, हिवरे, कोडीत खुर्द, गराडे काळेवाडी या गावात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असलेला रिंग रोड प्रस्तावित आहे.