Shirdi Additional Collector Office : शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 6 पदे मंजुर, शासन निर्णय जारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ०५ जूलै २०२३ : अहमदनगर जिल्ह्यासाठी शासनाने मंजुर केलेल्या शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Shirdi Additional Collector Office) अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश असणार आहे. इतर आठ तालुके अहमदनगर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Ahmednagar Additional Collector Office) कार्यक्षेत्रात असणार आहेत. शासनाने मंजुर केलेल्या शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी शासनाने नियमित वेतनश्रेणीवर ६ पदे मंजुर करण्याचा शासन निर्णय आज ०५ जूलै २०२३ रोजी शासनाचे उप सचिव संतोष गावडे यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे. (Shirdi Additional Collector Office News)

6 posts sanctioned for Shirdi Additional Collector office, Govt decision issued, Shirdi Additional Collector Office news,

अहमदनगर हा राज्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्यस्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभगाशी निगडीत सर्व कामकाजांसाठी नागरीकांना जिल्हा मुख्यालयी जाणे भाग पडते. सबब नागरीकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाने शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव १३.०६.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजुर केला होता. सरकारने शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ६ पदे नियमित वेतनश्रेणीवर मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी मंजुर करण्यात आलेली पदे खालीलप्रमाणे (6 posts sanctioned for Shirdi Additional Collector office, Govt decision issued)

१) अपर जिल्हाधिकारी – १
२) नायब तहसीलदार- १
३) लघू लेखक (निम्नश्रेणी) – १
४) अव्वल कारकून  – १
५) लिपीक टंकलेखक- २

शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट तालुके खालीलप्रमाणे

१) राहता
२) कोपरगाव
३) श्रीरामपूर
४) संगमनेर
५) अकोले
६) राहूरी

अहमदनगर अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट तालुके खालीलप्रमाणे

१) नेवासा
२) शेवगांव
३) पाथर्डी
४) कर्जत
५) जामखेड
६) पारनेर
७) श्रीगोंदा
८) अहमदनगर

शासनाने ०५ जूलै २०२३ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नेमकं काय म्हटले आहे ?

अहमदनगर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर तसेच अपर जिल्हाधिकारी कार्यालय, शिर्डी यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके, त्याअंतर्गत महसूल मंडळे, तलाठी साझे व त्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे स्तरावर करण्यात यावी.

अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांचे प्रतिवेदन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, अहमदनगर आणि नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक हे काम पाहतील.

अपर जिल्हाधिकारी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर यांना या शासन निर्णयान्वये कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १३ पोटकलम (३) अन्वये प्राप्त अधिकारांनुसार, जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्ती अपर जिल्हाधिकारी, शिर्डी यांना त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरत्या प्रदान करण्याबाबत स्वतंत्रपणे अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याकरिता येणारा खर्च ” मागणी क्र. सी-१, २०५३, जिल्हा प्रशासन, ०९४ इतर आस्थापना, (०१) उप विभागीय आस्थापना, (०१) (०२) विभागीय आयुक्त नाशिक (अनिवार्य), संगणक सांकेतांक (२०५३ ०१७१) ” या लेखाशीर्षाखाली दर्शविण्यात यावा व तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. मंजूर तरतूद अपुरी पडत असल्यास आठमाही अंदाजपत्रक सादर करताना वाढीव तरतूदीची मागणी करावी व ते शक्य नसल्यास पूरक मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. २३२ / आपुक, दि.०२/०५/२०२३ व नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दि.०६/०३/२०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार तसेच मंत्रीमंडळाच्या दि. १३/०६/२०२३ च्या बैठकीत प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०५१६४७११९९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.