pune crime news marathi | जिच्यासाठी नवरा मारला आता तिच सोडून जाणार मग केला खेळ खल्लास : प्रियसीच्या खून प्रकरणात जामखेडच्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पश्चिम बंगालला पळून जायच्या तयारीत असतानाच बाजीरावच्या मुसक्या आवळल्या

 

pune crime news marathi | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : प्रियसीचा खून करून पश्चिम बंगालला पळून जायच्या तयारीत असलेल्या जामखेड तालुक्यातील प्रियकराला मुंबईतील नालासोपारा भागात बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई भोसरी पोलिसांच्या पथकाने केली.

पुणे जिल्ह्य़ातील भोसरी भागातील धावडेवस्ती भागात राहणाऱ्या कलावती उर्फ कल्पना धोंडीबा सुरवार (वय 38) मुळगाव रा. मुखेड जिल्हा नांदेड या महिलेचा मागील महिन्यात खून झाला होता. हा खून जामखेड तालुक्यातील घाटेवाडी येथील रहिवासी असलेला तिचा प्रियकर बाजीराव विश्वनाथ साबळे याने केला होता अशी माहिती मयताचा मुलगा नामदेव सुरवार याने पोलिसांना दिली होती.आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे याच्या बरोबर मयत महिलेचे प्रेमसंबंध होते. तो तिला भेटण्यास येत अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली होती.

दरम्यान भोसरी पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीचा शोध जारी ठेवला होता.आरोपीचा मोबाईल व महिलेचा मोबाईल याचे तांत्रिक माहिती पोलिसांनी जमवत अधिक माहिती काढण्यास सुरूवात केली होती. तांत्रिक विश्लेषणात आरोपी हा मयत महिलेस भेटण्यासाठी तिच्या घरी आल्याचे निष्पन्न झाले होते.

भोसरी पोलिसांनी जामखेड परिसरात दोनदा सर्च मोहिम

दरम्यान भोसरी खून प्रकरणातील आरोपी हा जामखेड तालुक्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते.गुन्हा केल्यानंतर आरोपी जामखेडला गेला असेल या शक्यतेने भोसरी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जामखेड तालुक्यात दोनदा सर्च मोहिम राबवली होती. अनेकांकडे चौकशी केली होती.मात्र आरोपीचा ठावठिकाणा लागला नव्हता.

मित्राला फोन केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

प्रेयसीचा खून करून बाजीराव विश्वनाथ साबळे हा परराज्यात पळून जायच्या तयारीत होता. त्याआधी त्याने स्वता:चा मोबाईल बंद करून ठेवला होता.परंतु त्याने दुसऱ्याचा मोबाईल घेऊन भोसरीतील एका मित्राला फोन केला, दरम्यान त्याने केवळ फोनच नाही केला तर फोनवर खुनाची कबुली देखील दिली, तांत्रिक तपासात ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा गाठले.त्याचा ठावठिकाणा शोधला.आरोपी बाजीराव हा रेल्वेने पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी बाजीराव व मयत महिला होते खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर 

आरोपी बाजीराव विश्वनाथ साबळे व मयत महिला कलावती उर्फ कल्पना धोंडीबा सुरवार या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. हे दोघे बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे राहत होते. तेव्हापासून दोघांचे सुत जुळले होते. प्रेमात अडसर ठरणाऱ्या मयत महिलेचा नवरा धोंडीबा सुरवार याचा दोघांनी मिळून 2016 साली खून केला होता.त्याचा मृतदेह सौताडा दरीत फेकून दिला होता गुन्ह्यात बाजीराव साबळे व कलावती उर्फ कल्पना धोंडीबा सुरवार या दोघा प्रेमवीरांना अटक झाली होती. सध्या दोघेही जामिनावर मुक्त होते.

जिच्यासाठी नवरा मारला तिच सोडून जाणार मग केला खेळ खल्लास

सन 2019 मध्ये मयत महिला कलावती भोसरी येथे राहण्यास आली होती. आरोपी बाजीराव हा अधून मधून तिला भेटण्यासाठी येत असे व तिच्या बरोबर राहत असे. आरोपी बाजीराव विश्‍वनाथ साबळे यास मयत महिला ही सतत फोनवर व्यस्त असल्याचे दिसून आले. तसेच तिचे इतर कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू असावेत असा त्याला संशय आला व त्यावरून त्याने तिच्याशी सतत भांडत असायचा.

मयत महिलेने सतत भांडण करणार असशील तर माझ्या सोबत संबंध तोडून टाक असे आरोपी बाजीरावला सांगितले होते. तसेच 15 लाखाची मागणी केली होती. जर पैसे दिले नाही तर तुझ्याविरोधात मुलाला कोर्टात साक्ष द्यायला लावेल अशी धमकी मयत महिलेने बाजीरावला दिली होती.कलावती मुळे आपण तिचा नवरा धोंडीबा सुरवार याचा खून केला व आता ती सोडून जाणार तसेच आपल्या विरुद्ध कोर्टात साक्ष द्यायला सांगणार याचा राग मनात धरून कलावती हीचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

हि धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी, पोलीस अमलदार जी एन हिंगे, एस डी देवकर, जी पी सावंत यांनी केली आहे.