Police Bharti 2022 – 2023 | मोठी बातमी : तरूणांनो लागा तयारीला, पोलीस भरतीची, घोषणा,18 हजार जागांची होणार पोलिस दलात मेगा भरती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 22 ऑक्टोबर 2022 ।  आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Police Bharti 2022 - 2023, Big news, youths get ready, police recruitment announcement, 18 thousand seats will be mega recruitment in police force - announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis

केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रोजगार योजना राबवणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचं त्यांनी कौतुक केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रकल्प आहे. आज ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रा ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. “आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत.

मुख्यमंत्र्यांनी इतरही विभागांनाही निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे.रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ”, असं फडणवीस म्हणाले.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात घोषणा केली. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं.

“१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. २५ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी होईल. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.