चिंताजनक | ओमिक्रॉनचा विस्फोट, नियमित कोरोना रूग्ण दुपटीने वाढले, ओमिक्रॉनचा समुदाय संसर्ग सुरू?

जाणून घ्या महाराष्ट्रातील बुधवारची कोरोनाची स्थिती

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात बुधवारी ओमिक्रॉनचा विस्फोट झाला. बुधवारी आढळून आलेल्या ओमिक्रॉन रूग्णापैकी निम्या रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासासाचा इतिहास नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याशिवाय नियमित कोरोनाबाधितांच्याही संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. दिवसभरात 3 हजार 900 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यात गेली काही महिने कोरोना रूग्णांची संख्या कमी होती. मात्र चालू आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बुधवारी समोर आलेली आकडेवारी राज्याच्या चिंता वाढवणारी आहे. मंगळवारच्या रूग्ण संख्येपेक्षा बुधवारची रूग्णवाढ दुप्पट आहे. यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात एकुण 1 हजार 306 रूग्ण बरे होऊन घरी परतले,  आज अखेर राज्यात 65 लाख 06 हजार 137 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. बुधवारी दिवसभरात एकुण 3 हजार 900 नव्या कोरोनाबाधित रूग्णांचं राज्यात निदान झालं आहे.

राज्यात बुधवारी 20 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात बुधवार अखेर 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनचा विस्फोट

राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे.राज्यात बुधवारी ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे. राज्यात तब्बल 85 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 47 रूग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात तर 38 रूग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) अहवालात पाॅझिटिव्ह आढळून आहेत.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात आढळून आलेल्या 47 रुग्णांमध्ये मुंबई 34, नागपुर 03, पिंपरी-चिंचवड 03, नवी मुंबई 02, पुणे मनपा 02, पनवेल 01, कोल्हापूर 01, बुलढाणा 01 यांचा समावेश आहे. यातील 43 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर चौघे जण निकट सहवासित आहेत.

ओमिक्रॉनचा समुदाय संसर्ग सुरू ?

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) अहवालात आढळून आलेल्या 38 रुग्णांमध्ये मुंबई 19, कल्याण डोंबिवली 05, नवी मुंबई 03, पिंपरी-चिंचवड 03, वसई विरार 02, पुणे मनपा 02, पुणे ग्रामीण 01, भिवंडी निजापुर 01, पनवेल 01, ठाणे मनपा 01 या रूग्णांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक माहितीमुळे ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड ( समुदाय संसर्ग) सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या किती ?

राज्यात बुधवार अखेर 252 ओमिक्रॉन रूग्णांची संख्या झाली आहे. यातील 99 रूग्णांच्या RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आलेले आहे.

राज्यात आजवर आढळलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे

मुंबई 137, पिंपरी-चिंचवड 25, पुणे ग्रामीण 18, पुणे मनपा 11, ठाणे मनपा 8, नवी मुंबई 07, पनवेल 07, कल्याण डोंबिवली 07, नागपुर 06, सातारा 05, उस्मानाबाद 05, वसई विरार 03, औरंगाबाद 02, नांदेड 02, बुलढाणा 02, भिवंडी-निजामपूर मनपा 02, लातूर 01,अहमदनगर 01, अकोला 01, मिरा भाईंदर 01, कोल्हापूर 01 असे 252 ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. यात 09 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

राज्यात सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या किती ?

राज्यात बुधवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 14 हजार 065 इतकी आहे.  सर्वाधिक 8 हजार 60 सक्रीय रूग्ण मुंबईमध्ये आहेत. सर्वात कमी रूग्ण धुळे ( 2 रूग्ण) , नंदुरबार (4 रूग्ण), जळगाव (9 रूग्ण) या तीन जिल्ह्यात आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात सक्रीय रूग्ण किती ?

अहमदनगर जिल्ह्यात बुधवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 385 इतकी आहे