तीन ठिकाणी वीज कोसळली : एक शेतकरी ठार, 10 शेळ्या ठार, तर एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : राज्याच्या हवामान विभागाकडून बुधवारपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.  बुधवारी राज्यात वीज पडण्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

एका घटनेत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. तसेच दुसर्‍या  घटनेत 10 शेळ्यासुध्दा या घटनेत मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर तिसऱ्या घटनेत माय-लेकीसह एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. (Lightning struck three places in Nashik district: one farmer killed, 10 goats killed, five members of the same family unconscious)

अंगावर वीज पडल्याने एक शेतकरी ठार

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

माय-लेकीसह एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध

दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे.

वीज पडल्याने दहा शेळ्या जागीच ठार

तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या. दरम्यान, येत्या चार दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अगामी चार ते पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ज्या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.