जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत.आज औरंगाबादेत (Aurangabad) पंकजा मुंडे समर्थकांनी भाजपा (BJP) कार्यालयासमोर गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. (Radha of Pankaja Munde supporters in Aurangabad, loud slogans, attempts to enter the BJP office)
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद येथील समर्थकांनी आज दुपारी औरंगाबादमधील भाजपा कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मुंडे समर्थकांनी भाजपा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद मधील भाजपा कार्यालयासमोर जमलेल्या मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.औरंगाबादेत मुंडे समर्थक आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघांमध्ये पराभव केला होता, तेव्हापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी मुंडे समर्थकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लावावी ही मागणी जोर धरत होती,मात्र पक्षाकडून त्यांना डावलण्यात आल्याने आता मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.
पंकजा मुंडे ह्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांच्यावर राज्यसभेची जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता होती, मात्र तिथेही पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. तसेच 20 जुनला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला.
या सर्व घडामोडीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेेच जबाबदार असल्याची भावना मुंडे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजकीय वातावरणात तापवले आहे.
दरम्यान पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर डावलण्यात आल्यापासून पंकजा मुंडे ह्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. भाजप मध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणून करणार याकडे आता राजकीय वर्तुळात मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान औरंगाबादमध्ये ज्या मुंडे समर्थकांनी गोंधळ घालून भाजपा कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्या कार्यकर्त्यांची नावे मात्र अजूनही समोर आलेली नाहीत.