Big Breaking : औरंगाबादेत केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न, पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने राज्यातील मुंडे समर्थक नाराज आहेत.आक्रमक मुंडे समर्थकांनी भाजप नेत्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंडे समर्थक सध्या आक्रमक असून राज्यात वेगळ्या भागात आंदोलन करीत आहेत. रविवारी बीड आणि औरंगाबादमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. ( Big Breaking, Attempt to throw stones at Union Minister Bhagwat Karad’s office in Aurangabad, Pankaja Munde supporters beaten)

भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार प्रविण दरेकर हे आज बीड दौऱ्यावर होते, या दौऱ्यात मुंडे समर्थकांनी त्यांची गाडी आडवत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्या वेगात असल्याने त्या गाड्या काही कार्यकर्त्यांच्या अंगावर येता येता वाचल्या. यामुळे कार्यकर्ते थोडक्यात बचावले.

दरम्यान दुसरीकडे औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुंडे समर्थकांनी भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आक्रमक असलेल्या मुंडे समर्थकांना रोखले आणि ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांना केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाले असून पोलीस आता कार्यकर्त्यांची धरपकड करताना दिसत आहेत. दरम्यान या घटनेमुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.