आष्टीहून अहमदनगरच्या दिशेने सुसाट धावली हायस्पीड रेल्वे, आष्टीकरांनी अनुभवला ‘याची देही, याची डोळा’ ऐतिहासिक क्षणांचा नजारा ! (Ashti to Ahmednagar high speed train)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, 30 डिसेंबर 2021 : मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देऊ पाहणाऱ्या अहमदनगर – बीड – परळी या 261 किलोमीटर रेल्वे प्रकल्पाच्या (Ahmednagar – Beed – Parli 261 km railway project) उभारणीतील अडथळ्यांची शर्यत आता पार होऊ लागली आहे. या मार्गावरील 61 किलोमीटरचा टप्पा हायस्पीड रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी,29 डिसेंबर 2021 रोजी आष्टीहून अहमदनगरच्या दिशेने धावलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वी झाल्याने आष्टी तालुक्यातील जनतेने आनंदोत्सव साजरा केला. (Ashti to Ahmednagar high speed train ran, High speed rail test successful)
स्वातंत्र्यानंतर बीड जिल्ह्यात रेल्वे यावी यासाठी अनेक अंदोलने मोर्चे झाली. याच मुद्द्यांवरून निवडणूकीचे फड गाजले, राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली. बीड जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांपासून अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आपल्या ताकदीप्रमाणे ही लढाई लढली. ज्यांनी या रेल्वेमार्गाची संकल्पना पहिल्यांदा मांडली ते आज हयात नाहीत. पण त्यांच्या दुरदृष्टीमुळे बीड जिल्ह्यासारखा राज्यातील अतिशय मागास भाग रेल्वेच्या पर्यायाने विकासाच्या नकाशावर आला. अनेक वर्षांच्या लढाईला 2021 च्या सरत्या वर्षांत आले. बीड जिल्ह्यातील जनतेने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बीडकर परळी-बीड, अहमदनगर रेल्वेसाठी प्रयत्न करत आहेत. स्व खासदार केशरकाकु क्षीरसागर, स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केला होता.मागील काही वर्षांपासून या प्रकल्पावर वेगाने काम झाले. अखेर काल 29 डिसेंबर रोजी अहमदनगर- बीड-परळी रेल्वे (Ahmednagar – Beed – Parali Train) मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर बारा डब्यांची हायस्पीड रेल्वे धावली आणि बीडकरांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार झाले. या रेल्वेचा वेग ताशी 144 किलोमीटर एवढा होता. (Ashti to Ahmednagar high speed train ran)
खासदार प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीत Ashti to Ahmednagar high speed train रेल्वेचे स्वागत
29 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर (Ashti Railway Station) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Beed MP Pritam Mundhe) यांच्या हस्ते पूजा करून या रेल्वेचे स्वागत झाले. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. (Ashti to Ahmednagar high speed train ran)
आष्टीकरांचा आनंद गगनात
ताशी 144 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे पाहण्यासाठी आष्टी, कडा, सोलापूर वाडी रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याबरोबर ज्या मार्गावरून ही रेल्वे जात होती त्या मार्गाच्या दुतर्फा शेत शिवार, डोंगरावर उभे राहून नागरिक सुसाट धावणाऱ्या रेल्वेचा नजारा पाहत होते. मोबाईलमध्ये आष्टी तालुक्यात दाखल झालेल्या पहिल्या हायस्पीड रेल्वेचे चित्रिकरण केले जात होते.आष्टी तालुक्यात बुधवारचा दिवस अतिशय आनंदाचा उत्सुकतेचा आणि एका स्वप्नाला सत्यात उतरताना पाहण्याचा होता.आष्टीहून अहमदनगरच्या दिशेने हायस्पीड ट्रेन धावल्यानंतर हजारो बीडकरांनी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा उंचावत, रेल्वेला सलामी दिली. बीडमधील आष्टी रेल्वे स्थानकावरील हा प्रसंग आनंदाने भारलेला होता.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे बीडमधील रेल्वेचे स्वप्न साकार
बीड जिल्ह्यासाठी अहमदनगर बीड परळी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आहे. तो अनेक वर्षांपासून रखडला. अहमदनगर-बीड-परळी या 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला 1995 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी केवळ 353 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित होता. मात्र रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकल्प रखडला. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांचे सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी 27 वर्षांपासून रखलेल्या रेल्वे प्रकल्पाला वेग आला होता. या प्रकल्पातील 61 किलोमीटर अंतरावरील अहमदनगर ते आष्टी हा मार्ग आता रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला आहे. हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी झाली आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊन बीड जिल्ह्यातील नागरिकांचा रेल्वेच्या माध्यमांतून देशाशी संपर्क सुरू होईल.
मुंडे भगिनींनी केले स्वागत
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेल्या या रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे धावल्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे दोनी भगिनींनी या घटनेचे स्वागत केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचे मी अभिनंदन करते. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंद होतोय. अभिनंदन. तसेच मोदीजी, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार पंकजा मुंडे यांनी मानले.
मी इथे श्रेय घेण्यासाठी आले नाही तर…..
खासदार प्रीतम मुंडे यावेळी आयोजित स्वागत कार्यक्रमात म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांनी बीड रेल्वेसाठी संघर्ष केला. आंदोलने आणि मोर्चे काढले. आज आष्टीपर्यंत हायस्पीड रेल्वे धावली. मी इथे श्रेय घेण्यासाठी आले नाही तर स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल पाहण्यासाठी आले आहे, असे खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंडे समर्थकांनी स्व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमा उंचावत बीड जिल्ह्यात आगमन झालेल्या पहिल्या रेल्वेचे जंगी स्वागत केले.
अजून लढाई बाकी
अहमदनगर- बीड – परळी या 261 किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या खडतर मार्गाची बांधणी पुर्ण झाली आहे. आता पुढे परळी पर्यंत लोहमार्गासह, रेल्वे स्टेशन्स, उड्डाणपूल, सह आदी कामे वेगाने व्हावेत याकरिता अजून मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपसातील राजकीय वाद बाजूला ठेवून या प्रकल्पाला भरीव निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल तितक्या लवकर बीड जिल्हा विकासाच्या प्रवाहात वेगाने धावेल.