Big Breaking | जामखेडमध्ये आणखी एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। दि, 30 डिसेंबर 2021 | सत्तार शेख। जामखेडमध्ये आणखी एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे बेकायदेशीर सावकारकी करणारांचे धाबे दणाणले आहेत. सावकारकीचा आणखी एक गुन्हा दाखल होताच तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नववर्षाच्या स्वागताला अवघे दोन दिवस उरलेले असताना जामखेडमध्ये पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातील बेकायदेशीर सावकारकीचा गोरखधंदा मोडीत काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मोठी मोहिम उघडली आहे. यात सहकार विभागही कधी नव्हे ते ॲक्टिव्ह झाले आहे. अवैध सावकारकी विरोधातील मोहिमेला आता मोठे यश येताना दिसत आहे. त्यानुसार तालुक्यातील काही सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तालुक्यात अजुनही मोकाट असलेल्या ‘कुख्यात’ सावकारांविरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. यासाठी तक्रारदारांनी पुढे येण्याची गरज आहे.

जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती येथील अन्सार युसुफ पठाण या सावकाराविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार विभागाने पठाण यांच्या घरावर जुलै महिन्यात छापा टाकला होतो. या छाप्यात सहकार विभागाला बेकायदेशीर सावकारकीचे अनेक अक्षेपार्य कागदपत्रे आढळून आले होते. तब्बल सहा महिने सहकार विभागाने तपास केल्यानंतर 29 डिसेंबर  रोजी पठाण याच्या विरोधात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी एका सावकारावर जामखेडमध्ये गुन्हा दाखल

कर्जत येथील सहकार अधिकारी साहेबराव पाटील यांनी अन्सार युसुफ पठाण रा सदाफुलेवस्ती, जामखेड या सावकाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सावकारी अधिनियम 2014चे कलम 39 प्रमाणे जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पठाण याच्याकडून बेकायदेशीर सावकारकीसंदर्भात अनेक कागदपत्रे आढळून आले होते. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव गाडे हे करत आहेत.

कुख्यात पांढरपेश्या सावकारांवर कारवाई कधी ?

जामखेड तालुक्यात अवैध सावकारकीचे मोठे रॅकेट आहे. राजकारण्यांसह, व्यावसायिक, तथाकथित सुशिक्षित वर्गही यात सहभागी आहे. गुंडांच्या टोळ्या पोसून हे रॅकेट चालवले जाते अशी वंदता आहे. पांढरपेश्या सावकारांचा बुरखा फोडण्यासाठी राजकीय दबाव झुगारून कारवाईचा दणका देणे आवश्यक आहे. ज्या सावकारांनी गुंडागर्दीच्या जोरावर सामान्यांची छळवणूक केली अश्यांवर कारवाई कधी होणार ? याकडे आता तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

सहकार विभागाचा छापा आणि सहा महिने

सहकार विभागाने अन्सार पठाण या सावकारच्या घरावर जुलै महिन्यात छापा टाकला होता. या छाप्यात अनेक आक्षेपार्य कागदपत्रे आढळून आली होती. या प्रकरणात तातडीने अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. परंतू गुन्हा दाखल होण्यास तब्बल सहा महिने लागले. सहकार विभागाने इतका वेळ का घेतला ? या काळात नेमका कोणता तपास केला ? याची माहिती समोर आली नाही, मात्र सहा महिन्यात तडजोड न झाल्यानेच हा गुन्हा दाखल झाला अशीही चर्चा आता जनतेत रंगली आहे.

तक्रार करा.. संरक्षण करू

कितीही मोठा सावकार असो त्याच्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. सावकाराविरोधात तक्रार देण्यास नागरिकांनी निडरपणे समोर यावे, तक्रारदाराचे सर्वोतोपर संरक्षण करण्याची जबाबदारी जामखेड पोलिस करतील. तक्रारदाराला कसलाही त्रास होणार नाही. जामखेड पोलिस दलाने अवैध सावकारकी विरोधात उघडलेली मोहिम नव्या वर्षांतही सुरू अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

Big Breaking | जामखेडमध्ये आणखी एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल case has been registered against another lender in Jamkhed – First publish by jamkhedtimes.com