Manoj Jarange Patil news today : मराठवाड्यातील अनेक भागात इंटरनेट सेवा ठप्प, जालना – बीड सीमा बंद, एसटी सेवा ठप्प !

Manoj Jarange Patil news today : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत रविवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या, असे म्हणत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र जरांगे पाटील यांनी मुंबई दौरा आज रद्द केला. मनोज जरांगे पाटील हे माघारी फिरले आहेत. ते पुन्हा आंतरवलीत दाखल झाले आहेत. प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरु करा असे अवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे.

Manoj Jarange Patil news today, Internet service suspended in many areas of Marathwada, Jalna-Beed border closed, ST services suspended, curfew applies

भांबेरी गावात रात्रभर हजारो समर्थकांसहीत मुक्काम केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शहाणी भूमिका घेऊन अंतरवलीला परत जात आहे, अशी घोषणा त्यांनी केली. या निर्णयानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मागील वेळेस मराठा आंदोलनाच्या काळात बीड आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अधिकची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

अंतरवाली सराटीमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्यामध्ये दाखल झालं असून अंतरवाली सराटीमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक गाडी तपासूनच सोडली जात आहे. कोणालाही परवानगी शिवाय या जिल्ह्यांमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. मागील आंदोलनाच्या वेळेस जालन्यामध्ये आमदाराच्या घर पेटवून देण्यात आलं होतं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता.

रविवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील अचानक मुंबईला जायचंय म्हणत अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा एकच गोंधळ उडाला.अंतरवाली सराटीपासून काही किलोमीटरवरील भांबेरी गावातून मागे फिरले. मात्र या कालावधीत तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करुन जालना आणि बीड जिल्ह्यात संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलं. पोलिसांनी बीड आणि जालन्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले असून सीमा सील केल्या आहेत.

बीडमध्ये तब्बल 38 ठिकाणी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 37 (1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. बीडमध्ये आज म्हणजेच सोमवारी (26 फेब्रवारी रोजी) दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड प्रमाणेच जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना प्रशासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत.

भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे या 2 सहकाऱ्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू होणार

बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहिल. वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू केली जाईल आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्यात आणखी वाढ केली जाईल, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.