हिंदुस्थानी भाऊजी चिथावणी : राज्यभरातील दहावी बारावीचे आक्रमक विद्यार्थी उतरले रस्त्यावर, अनेक ठिकाणी अंदोलन

मुंबई : सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नामक युट्यूबरने पसरवताच याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. राज्यभरातील विद्यार्थी आक्रमक झाले असून  राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. काही ठिकाणी अंदोलन चिघळल्याचे वृत्त आहे.(students agitation all over the state)

राज्यात आज नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. ऑफ लाईन परिक्षा नको असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसेच ऑनलाईन अभ्यासात अडचणी आल्याने आमचा अभ्यास पुर्ण झाला नाही. एक महिना परिक्षा पुढे ढकला, ऑनलाईन परिक्षा घ्या अशीही मागणी विद्यार्थी करताना दिसत आहेत.

आजचे अंदोलन हिंदुस्थानी भाऊने जारी केलेल्या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. आक्रमक झालेल्या अंदोलकांनी नागपूर सह काही भागात हुल्लडबाजी केली. एका ठिकाणी स्कूल बसची तोडफोड करण्यात आली.  यामुळे आता सरकार या अंदोलनवर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अंधेरी येथील निवासस्थानासमोर अंदोलन केल्याचे वृत्त आहे. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओत काय म्हटले?

दोन वर्षांत कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेले नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊने (student aggression After the rumor of Hindustani Bhau)त्याच्या व्हिडिओतून केला आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का? विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळू नका. त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. आता देखील तुम्हाला विनंती करत आहे की विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. तेव्हा मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो आता लाखो विद्यार्थ्यांसोबत उतरणार, असा इशाराही हिंदुस्थानी भाऊने दिला होता.

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया-

मात्र या व्हिडिओमुळे सध्या राज्यभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे.तर यावरच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असे वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे

विद्यार्थी या मागणीवर उतरले रस्त्यावर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचा धोका पाहता बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज नागपुरातील ट्रिलीयम मॉल मेडिकल चौकात आंदोलन केले. राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होवू शकतात. मग, १० वी, १२ वीच्या बोर्ड परीक्षासुद्धा ऑनलाईन व्हायला हव्यात, अशी मागणीपर विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा गेली २ वर्ष बंद आहेत. व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. परंतू, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पडला आहे. ऑनलाईन क्लासेस प्रत्येकाला अटेंड करणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुटला आहे, अशा विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेतल्या जाणार आहेत, हा विद्यार्थ्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्याचा इशारा आहे. ह्याबाबत देखील पुर्नविचार करावा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.