Crop insurance | PMFBY पीक विम्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता (Crop Insurance) पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. मात्र, योजनेमध्ये सहभागी झाले तरी ( E-Pik Pahani ) ई-पीक पाहणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असे धोरण होते.मात्र, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Government’s big decision regarding crop insurance)

विमा हप्ता भरताना ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक होती मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. गतवर्षी याच अटीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. शिवाय पिकाचे क्षेत्र आणि प्रत्यक्षात असलेला पेरा यामध्ये तफावत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

PMFBY पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे. आतापर्यंतच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल असा अंदाज आहे.पेरण्या लांबल्याने आतापर्यंत केवळ 13 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला असला तरी ही संख्या वाढेल असा आशावाद कृषी विभागाला आहे.

शासनाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य ही अटच दूर केली आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे तर 1 ऑगस्टपासून पीक पेऱ्याची नोंदी घेण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पाहणीची नोंद सक्तीची असल्याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, प्रत्यक्ष सहभाग घेतानाचे पीक आणि पाहणीच्या वेळीचे पीक यामध्ये तफावत असल्याचे मत कृषी विभागाने वर्तवले. त्यामुळे शेतकरी हे मदतीपासून वंचित राहत असल्याने ही अट रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात सन 2022 – 2023 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2022 असा आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 01 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.

पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ही पिक पाहण्याची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो.

शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही.

सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र 01 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले जाते.