गुड न्यूज । डिझेलने साजरे केले दिमाखदार शतक, इंधनदरवाढीचा सपाटा सुरूच

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । देशात गेल्या दहा दिवसांपासून इंधन दरवाढ सुरू आहे. पेट्रोलने काही महिन्यापुर्वी शतक साजरे केल्यानंतर डिझेल कधी शतक साजरे करणार याकडे अवघ्या भारतीयांचे लक्ष लागले होते.अखेर तो सुदिन उजाडला आहे.डिझेलने मोठ्या दिमाखात शतक साजरे करत हम भी कुछ कम नही असाच निर्धार जाहीर करत पेट्रोलला डिवचले आहे. (Good news Diesel Celebrates Bright Century, Fuel Rise Continues)

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. आज गुरूवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 80 आणि 84 पैशांनी महागले. मागील 10 दिवसांत 9 वेळा दरवाढ झाली आहे. (Good news Diesel Celebrates Bright Century, Fuel Rise Continues)

गेल्या अनेक महिन्यांपासून शतक साजरे करण्यास आसुसलेल्या डिझेलने मोठ्या दिमाखात शतक साजरे करण्याची किमया केली.पेट्रोल आणि डिझेलला उच्चांकी भाव मिळत असल्याने विक्रीत वाढ होणार आहे. महागाईचा भडका उडून मालवाहतूकीचे दर वाढू शकतात परंतू इंधनदरवाढीवर ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ अशीच अवस्था जनतेची झाल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी 22 मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. या दरम्यान पेट्रोल आणि डिझेल 6 रुपये 40 पैशांनी महागले आहे. मुंबईत आज गुरुवारी पेट्रोल 80 पैसे आणि डिझेल 84 पैशांनी महागले आहे.आजच्या दरवाढीनंतर एक लीटर पेट्रोलचा भाव 116.72 रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव 101 झाला आहे.