आमच्या नादी लागू नका, तुमच्यावर आयकर, ईडीच्या धाडी टाकू : भाजपा नेते बबनराव लोणीकरांची महावितरणच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

मुंबई  : वीज बील थकल्यामुळे मीटर काढून नेल्याने जळफळाट झालेले भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना अर्वाच्च्य आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. (BJP leader Babanrao Lonikar’s insistence on MSEDCL officials)

अरे नालायकांनो लै माज चढला का, एका मिनिटात घरी पाठविल अशी दमबाजी करत ईडीच्या धाडी टाकण्याची थेट धमकीही लोणीकरांनी दिली.लोणीकरांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, प्रकरण शेकणार असल्याचे दिसताच बबनराव लोणीकर यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी थापेबाजी केली.

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा सातारा परिसरात आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे जवळपास साडेतीन लाख रुपये बील थकले आहे. बील थकल्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी बंगल्याचे मीटर काढून नेले. मीटर काढून नेल्याचे कळताच बबनराव लोणीकर यांनी अभियंता दादासाहेब काळे यांना मोबाईलवरून संपर्क साधला आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.

माझे मीटर का काढून नेले. तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? अरे नालायकांनो आम्ही बील भरतो. संभाजीनगरच्या बंगल्याचे मी 10 लाख रूपये बील भरले आहे. तुमच्यात दम असेल तर झोपडपट्टीत जा. जे लोक आकडे टाकून वीज चोरतात त्यांच्याकडे जा.

दहा लाख रुपये भरूनही माझे मीटर काढून नेण्याची हिंमतच कशी झाली. एका मिनिटात तुला घरी पाठविल. माज चढला का? नोटीस मला दिली का? तीस वर्षे आमदार आहे मी. मंत्री होतो. नोटीस न देता मीटर काढून नेले. अक्कल आहे का! मी पागल आहे का, मीटर काढून नेले म्हणूनच बोलतोय. अशी उद्दाम भाषा बबनराव लोणीकर यांनी वापरली.

झोपडपट्ट्या, दलित वस्त्यांमध्ये जाण्याची हिंमत दाखवा. त्यावर महावितरणच्या अभियंत्याने साहेब, तीन लाख रुपये बील आहे. आम्ही मीटर काढले नाही. तुमच्या मुलाला भेटलो. असे सांगितले. त्यावर बबनराव लोणीकर म्हणाले, जे पैसे देतात त्यांच्याच मानगुटीवर बसता. एक रुपयांची वीज आम्ही चोरत नाही. जे वीज चोर आहेत त्यांच्या मागे लागा. हिंमत असेल तर दलित वस्त्यांमध्ये जाऊन आकडे काढा. ते मटन कापण्याचे सत्तूरने तुम्हाला तोडतील.

आयकर, ईडीच्या धाडी टाकू

मीटर काढून नेले नाही असे अभियंता दादासाहेब काळे यांनी वारंवार सांगूनही बबनराव लोणीकर अद्वातद्वा बोलतच राहिले. तुमच्या नालायक लोकांनी मीटर काढून नेले असेल. राजाला दिवाळी काय माहिती. आमच्यावर सुड उगवू नका. तुम्ही कुठे पैसे कमावले, कुठे चोर्‍या केल्या हे मला माहिती आहे. तुमच्या कुंडल्या काढू. आमच्या नादी लागू नका, तुमच्यावर आयकर, ईडीच्या धाडी टाकू अशी थेट धमकीच बबनराव लोणीकर यांनी दिली. जालन्याच्या जिल्हाधिकार्‍यांना मी तीन तास कोंडून ठेवले होते हे लक्षात ठेवा असा इशाराही लोणीकर यांनी दिला.

चौकशी करून कारवाई करणारच

थकित वीज बिल वसुलीसाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचे मीटर जप्त करण्यात आले. त्यानंतर सहायक अभियंता दादासाहेब काळे यांना शिवीगाळ करण्यात आली अशी तक्रार आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संभाजीनगर, जालना तसेच गावाकडच्या घरांची तसेच शेती आणि इतर ठिकाणच्या थकित वीज बिलाची माहिती मागवण्यात आली आहे. चौकशी करून या प्रकरणात कारवाई करणारच असे महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.