अखेर राज्यावरील वीज संकट टळले, MSEB कर्मचाऱ्यांचा संप मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला आले यश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. ३२ संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता. या संपामुळे राज्य अंधारात बुडाले होते. राज्यातील अनेक भागातील बत्ती गुल झाला होती. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. MSEB च्या या अंदोलनाची राज्य सरकारने तातडीने दखल घेतल्याने राज्यावरील वीज संकट तूर्तास टळले आहे.
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचारा संघटनांची आज बैठक घेतली. तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. “राज्य सरकारला या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. उलट पुढच्या तीन वर्षांत या तीनही कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही.”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
“ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, तसे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे फडणवीस म्हणाले. समांतर खासगी परवाने देण्याबद्दल अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, संमातर परवाने पद्धतीला विरोध करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. याबद्दल कर्मचाऱ्यांची समजूत घालताना ते म्हणाले की, हे नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढले आहे. जेव्हा एमआरसी यावर नोटीफिकेशन काढेल त्यात आपण सरकारची सर्व बाजू मांडू.”
कंपनीच्या हिताचाच निर्णय एमआरसीच्या माध्यमातून झाला पाहीजे, असे राज्य सरकारचे स्पष्ट धोरण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच संघटना आणि सरकारची बैठक यापुर्वीच झाली असती तर गैरसमज निर्माण झालेच नसते. सरकारने मांडलेली भूमिका संघटनांना पटले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि तीनही सरकारी कंपन्यांतील अधिकृत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाल्याने वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.