Breaking News : राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ, अजित पवार गटाचे मंत्री व नेते शरद पवारांच्या भेटीला; या भेटीत नेमकं काय घडलं ? प्रफुल्ल पटेलांनी केला मोठा गौप्यस्फोट !
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिवसेना भाजप युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदे मिळाली. खातेवाटप झाले. पावसाळी अधिवेशनात सोमवारपासून सुरु होत. त्याआधीच रविवारी राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी हालचाल पहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्यात पुन्हा उलथापालथ होणार का? याची जोरदार चर्चा रंगत लागली आहे. परंतू आता या भेटीचा तपशील समोर आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनिल तटकरे, छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ सह आदी फुटीर गटातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटातील नेते शरद पवारांना भेटायला येताच सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांना तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावून घेतले.
अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं याची राज्याला उत्सुकता लागली आहे. भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटेल म्हणाले की, “शरद पवारआमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेलो होतो. शरद पवार हे आज त्यांच्या कामानिमित्त यशवंत चव्हाण सेंटर येथे येणार होते, याची कल्पना आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांची या ठिकाणी भेट घेतली”.
“आम्ही सर्वांनी मिळून शरद पवारांना विनंती केली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहिल, याचा विचार करावा. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मात्र, यावर अद्याप शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की, विधिमंडळात आवाराच्या विरोधी पक्ष नेते अबादास दानवे यांच्या दालनात पावसाळी अधिवेशनासाठी तयारी करण्याच्या संदर्भात बैठक होती. एवढ्यात मला खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला. अध्यक्ष शरद पवारांनी तुम्हाला तातडीने बोलावलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सरकारमध्ये सहभागी मंत्री आणि नेते शरद पवारांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांचे सर्व नेते उपस्थित होते. या भेटीत सर्वांनी शरद पवारांसमोर आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. यातून काहीतरी मार्ग काढा अशी विनंती केली. मात्र यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आता ते सर्व भेटायला आले होते. ही घटना आमच्यासाठी अनपेक्षित होती. पण आम्ही आमची भूमिका घेतली आधीच आहे. ते भेटायला येतील असा विचार केला नव्हता. आताच या भेटीवर काही बोलणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत यावर आम्ही चर्चा करू. सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे मंत्री आज भेटीला आले. त्यांची अचानक भेट झाली. यामागचा त्यांचा उद्देश आजच सांगणे अवघड आहे. पण त्यांनी खंत व्यक्त केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “अजित पवारांच्या नेतृत्वात, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही सर्व नेते आमच्या सर्वांचे दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. आम्ही त्यांना वेळ मागितला नव्हता, आम्हाला समजले की, शरद पवार यशवंत चव्हाण सेंटरला बैठकीसाठी आले आहेत. संधी साधून आम्ही सगळे त्यांना भेटालो, त्यांचा आशीर्वाद घेतला.”
“आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसांत आम्हाला मार्गदर्शन करावे. पवार साहेबांनी आमचे म्हणने शांतपणे ऐकून घेतले, पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री अजित दादांच्या नेतृत्वात उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधासभेत पार पाडतील.”
दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेल्यानंतर मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांचे पाय धरले आणि नतमस्तक झाले. छगन भुजबळ आत जाताच ‘विठ्ठला सांभाळून घे आम्हाला’ असा धावा केला. फुटीनंतर आमचा वाद विठ्ठलाशी नसून बडव्यांशी आहे, असं अजित पवार गटाचे नेते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांचा विठ्ठल म्हणून उल्लेख झाला. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अजित पवार गटाकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती केली गेली. अजित पवार यांना शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.