एक शिकारी, 5 जिल्हे, 12 बळी, साडेतीनशे किलोमीटरचा रक्तरंजित प्रवास

जामखेड टाईम्स ( स्पेशल रिपोर्ट) बिबट्याचा रक्तरंजित प्रवास कधी थांबणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतातनाच करमाळा तालुक्यातील बिटरगाव – वांगी – ढोकरी शिवारामध्ये शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत सुरू असलेला “रहस्यमयी नरभक्षक बिबट्या” या कथेतला सर्वाधिक थरारक अंक पार पडला. या थरारक अंकात बिबट्याने वनविभागाला चकवा तीनदा दिला. बिबट्या पळून गेल्याने या भागातील पाच किलोमीटर परिसरातील जनतेला आता सावधानतेचा इशारा देण्यात आहे. शनिवारी तपास केला असता त्याचा ठावठिकाणा शोधण्यात वनविभागाला अपयश आले.

एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथेला लाजवेली अशी पटकथा सध्या करमाळा तालुक्यात घडत आहे. दोन महिन्यांपुर्वी या पटकथेची सुरवात झाली जालन्यापासुन. या पटकथेने जालना, पैठण, पाथर्डी, पाटोदा, आष्टी  व आता करमाळा असा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करत  तब्बल 12 जणांचे बळी घेतले आहेत. चार जिल्ह्याची झोप उडवलेल्या या पटकथेने आता सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याची पुरती झोप उडवून टाकली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासुन करमाळा तालुका प्रचंड दहशतीखाली वावरत आहे. जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. भेदरलेली माणसं नवा दिवस कुठले नवे संकट घेऊन उगवेल याच चिंतेने ग्रासुन गेले आहेत.

वार शुक्रवार, ठिकाण बिटरगाव वांगी परिसर , वेळ सायंकाळची. शिकारी खुद शिकार हो गया हे वाक्य खरं ठरणार होतं. शार्प शुटर्सने त्याला हेरलं. त्यानेही माणसं हेरली. आता कोणत्याही क्षणी थरार होणार अशी स्थिती. वनाअधिकारी कर्मचारी व स्थानिकांचे श्वास रोखले गेले. त्याची हालचाल होताच शार्प शुटर्सने निशाणा साधला. बंदुकीतुन ऐकापाठोपाठ तीन गोळ्या सुटल्या, तो गारद झाला असेल असे वाटत असतानाच शातीर बिबट्याने तीनही गोळ्या चुकवून थेट ऊसाच्या फडात धुम ठोकली. अन शिगेला पोहोचलेली उत्सुकता भंगली.कसलेल्या पैलवानाने जसा शेवटचा हुकमी डाव टाकून बाजी पलटवावी तसाच प्रकार त्या नरभक्षक बिबट्याने केला. वनविभागासह शार्प शुटर्सच्या सापळ्याला भेदून त्याने ठोकलेली धुम सर्वांचीच झोप उडवणारि ठरली.

वनविभागाने शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत डॉग स्कॉड व स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मशाली पेटवून त्याचा शोध घेतला जात होता. साडे अकराच्या सुमारास बिबट्याने एका उसाच्या शेतातून धुम ठोकल्याचे अनेकांनी पाहिले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली शोध मोहिम थांबवली गेली.  वनविभागाच्या शोध मोहिमेला वैदू समाजातील काही नागरिकांनी मदत केली.दरम्यान बिटरगाव – वांगी – ढोकरी परिसराच्या तीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिसराला बिबट्या धोका निर्माण झाला आहे. आसपासच्या सर्व गावांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे अवाहन प्रशासनाने केले आहे.

पाच जिल्ह्यातील लाखो लोकांची झोप उडवणार्या त्या नरभक्षक बिबट्याचा रक्तरंजित प्रवास आता थांबायलाच पाहिजे अन भेदरलेल्या माणसांना मोकळा श्वास घ्यायला दिला पाहिजे. पण बिबट्या सुसाट ,जनता कोमात अन अपयशी प्रशासन ही स्थिती आहे.