नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत दमदार भाषण, काय म्हणाले मुख्यमंत्री? वाचा सविस्तर!

Eknath Shinde Latest News Today : उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य शासनाने विकासाचा अटलसेतू पार केला असून समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरुन बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभेत नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वच क्षेत्रांचा आढावा घेत दमदार भाषण केले.

गेल्या दोन वर्षांत दावोसमध्ये पाच लाख कोटींच्या परदेशी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. गेल्यावर्षीच्या करारांपैकी 80 टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून सुमारे तीन ते साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पूरक उद्योगांमुळे आणखी काही लाख लोकांना रोजगार मिळेल. देशातला पहिला ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय. राज्याला एक ट्रीलियन डॉलर्स इकॉनॉमी बनविण्याचा निर्धार असून तो आम्ही नक्की पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निर्धारित वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे.साडे सहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांच्या कर्जफेडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्यामुळे राज्य शासन बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29 हजार 520 कोटी रुपये बँक खात्यावर जमा केले आहेत.

केंद्र सरकारच्या योजनेपासून प्रोत्साहन घेत राज्य सरकारनेही ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजना सुरू केली आहे.पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1720 कोटी रुपये जमा झाले होते. नुकतेच दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटीचे 3800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून एकूण 5520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. या दोन्ही योजनेअंतर्गत 35 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाले आहेत.

वेळी अवेळी पाऊस, गारपीट अशा अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षांत 15 हजार 212 कोटी रुपयांची मदत दिली आहे.तसेच, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिली आहे.

राज्य शासनाने 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून सुमारे 99 हजार 103 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून सुमारे 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. वैनगंगा-नळगंगा सर्वेक्षण सुरु असून पैनगंगाचा डीपीआर तयार आहे. लवकरच ही कामे सुरु होतील.

वशिष्ठीमधून समुद्रात वाहून जाणारे पाणी मध्यम बंधारे बांधून कोकणात वळविण्यात येत आहे. मराठवाडा वॉटरग्रीडलाही चालना देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देत दोन कोटी 80 लाख एकर जमीन संरक्षित केली आहे. नुकसान झालेल्या 64 लाख 41 हजार शेतकऱ्यांना तीन हजार 49 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 55 लाख 21 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार 641 कोटी थेट जमा झाली आहेत.

धानाला हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस देण्याचा जीआर निघालाय. दोन हेक्टरपर्यंत ही मर्यादा आहे. त्यामुळे प्रत्येकी 40 हजारांचा बोनस धान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार 190 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या योजनेचे 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. लवकरच बँक खात्यात डीबीटीद्वारे ते पैसे जमा होतील. मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यांतील एकूण 77 हजार 207 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, संत्रा, लिंबू इत्यादी पिके बाधित झाली आहेत. त्याचे पंचनामे सुरू असून त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषानुसार नुकसान भरपाई दिली जाईल.

महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झालाय. तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, भूजलात घट झालेले 31 तालुके आहेत. हे सर्व लक्षात घेऊन आधीच उपाय योजना करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा कमी आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईकरांना तूर्तास कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील महिला, भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नुकतेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. ‘लेक लाडकी’ योजनेमुळे 18 वर्षांपर्यंतच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये नुकतीच 20 टक्के वाढ केली आहे. त्यांना सुधारित मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले आहेत. यामुळे या अंगणवाडी सेविकांचे काम सुलभ आणि गतीने होईल. अंगणवाडी केंद्रांमधील 20 हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. बचत गटांच्या भाग भांडवलात, सीआरपींच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आशासेविकांना देखील न्याय दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन कोणत्याही गुन्हेगारीचे समर्थन न करता आकसापोटी कुणावरही अन्याय केला जाणार नाही, तथापि कायदा मोडणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मुंबई, पुणे येथे ड्रग्जच्या विरोधातली मोहिम तीव्र केली आहे. कायदा सुव्यवस्थाही बळकट असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना 75 हजारांच्या तीनपट म्हणजे एक लाख 61 हजार 841 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 45 हजार 152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

सहा हजार पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत, हे शासनाचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. अनुकंपा तत्त्वावर सुमारे तीन हजार 334 उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. राज्यभर आता नमो महारोजगार सुरु आहे, नागपूर, लातूर, अहमदनगर मेळाव्यात 20 हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले आहेत. पुढे अजून बारामती, ठाणे येथे महारोजगार मेळावे याच आठवड्यात होणार असून शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वा तीन कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या पावणेदोन वर्षांत आपला महाराष्ट्र सर्वंच क्षेत्रात नंबर वन आहे. एक लाख कोटीपेक्षा अधिक विदेशी थेट गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकवर आहे. आठ लाख कोटी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या कामातही महाराष्ट्र नंबर वन आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी आणि जीएसडीपी मध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे.

निर्यातीमध्ये, स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आपण उभारला तिथेही महाराष्ट्र नंबर वन आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही आपला महाराष्ट्र नंबर वनच आहे. स्वच्छतेत देखील महाराष्ट्र नंबर बनला आहे. मुंबईमध्ये दर आठवड्याला डीप क्लीन मोहिमेत तर सहभागी झालो. यामुळे रस्त्यावरची धूळ कमी झाली, उपनगरे, समुद्र किनारे, रस्ते स्वच्छ होत आहेत. मुंबईतले प्रदुषण कमी झाले आहे. ही मोहीम आता राज्यव्यापी होत आहे. राज्यभरात स्वच्छतेची स्पर्धा सुरू झाली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा तिसरा टप्पा आता सुरू करत आहोत. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग आता लवकरच खुला होत आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. मुंबई कोस्टल रोड, मेट्रो तीन, पुणे मेट्रो, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लवकरच लोकार्पण होणार आहे. नागपूर-गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग, कोकण कोस्टल रोड, कोकण एक्सप्रेस वे, महाराष्ट्रात सात हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे ग्रीड केले जात आहे. त्यामुळे चांदा ते बांदा जोडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकरांना मालमत्ता करात 736 कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. अनेक वर्षे रखडलेल्या एसटीपी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुंबईच्या महापालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन सुविधा सुरु करण्यात आली आहे. लंडन, न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 आणि कोस्टलची सुमारे 200 अशा एकूण 320 एकर जागेवर सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना शुद्ध हवा आणि मनोरंजनासाठी हक्कासाठी जागा मिळेल.

राज्यातील एसटी बस स्थानकांचा मेकओव्हर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान गिनिज बुकमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ तयार करतोय. मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जात आहेत. धारावीकरांना स्वतःचे हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे. मुंबईतील जुन्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास सुरू केला आहे. म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, बीएमसी, महाप्रितच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारले जात आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाल यांच्या स्मारकासाठी जागा दिली आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थानाचे भव्य स्मारक उभारले जात आहे.

12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड आणि कार्ल्याच्या एकविरादेवी येथे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदूमिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पूर्णत्वास आले असून केवळ पुतळ्याचे काम सुरु आहे. अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात वर्ग केला आहे. याबाबत पाठपुरावा सुरु आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर, बारवांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्णय झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी दिला आहे. बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळाची निर्मिती केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळालाही तत्वतः मान्यता दिली आहे.

गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी, मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना, श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय असे असंख्य निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका सुरुवातीपासून होती. 10 टक्के आरक्षण दिलेय आणि त्याची अंमलबजावणीसाठी करून 26 फेब्रुवारीपासून कायदाही लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता पोलिस आणि शिक्षक भरती सुरू होतेय. तिथेही मराठा आरक्षणाचा लागू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.