Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रूपये मदतीची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याकडे रवाना

बुलढाणा, 1 जूलै 2023  : Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात बस जळून खाक झाली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत २६ जीवंत माणसं जळून खाक झाली. या दुर्दैवी भीषण घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Buldhana Bus Fir)

Buldhana Bus Accident, Announcing Rs 5 lakh for heirs of deceased in Buldhana bus accident, Chief Minister Eknath Shinde leaves for Buldhana

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्देवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याला रवाना झाले आहेत.

या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

नेमकी घटना काय ?

यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्र.MH29 BE1819 ही यवतमाळ येथून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्र.३३२ जवळ रात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर लगेच बसने पेट घेतला.

यावेळी पाच प्रवाशी व ट्रॅव्हल्सचे तीन कर्मचारी असे आठजण तात्‍काळ बसमधून बाहेर पडले. अन्य २६ प्रवाशी रात्रीच्या गाढ झोपेत असल्याने व बसने मोठा पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जळून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताची बातमी कळल्यानंतर पोलीस, अग्नीशमन दल आदी यंत्रणा मदतीसाठी धावल्या. परंतू बसमध्ये आगीने रौद्र रूप धारण केल्‍याने सर्व हतबल झाले. ते बसमधील प्रवाशांना वाचवू शकले नाहीत. आगीत होरपळलेल्या प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा होता. आरोग्य विभाग व पोलीसांनी सर्व मृतदेह बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत.

या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आठ जणांवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मृतांची नावे मिळवण्याचे व ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात मोबाईल क्र.7020435954 आणि 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अपघातातील जखमी व्यक्तींची नावे : (चालक)-शे.दानीश शे.ईस्माईल या.दाव्हा जि.यवतमाळ, (क्लिनर) संदीप मारोती राठोड (३१) रा तिवसा, योगेश रामराव गवई रा.औरंगाबाद., साईनाथ चरमसिंग पवार (१९) रा माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये या.पांढरकवडा, पंकज रमेशचंद्र रा.कांगडा (हिमाचल प्रदेश) या अपघातातील बसचा चालक व क्लिनर या दोघांना सिंदखेडराजा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बुलढाणा बस अपघातातील नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली

बुलढाणा बस अपघातातील मृतांमध्ये नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे कामे सुरु आहे.