Big News :  ठाकरे सरकारची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना निर्बंधाबाबत राज्य सरकारने 31 मार्च रोजी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना अटोक्यात यावा यासाठी सरकारने लावलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुढीपाडव्यापासून राज्यात कोरोनाचे कुठलेच निर्बंध लागू असणार नाहीत. (Big News, announcement of Thackeray government; Removed all restrictions on corona in Maharashtra)

गेल्या दोन अडीच वर्षांपासुन जगभरात कोरोना महामारी मोठा धुमाकुळ घातला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा, कोरोनाचा उद्रेक कमी व्हावा याकरिता सरकारने लाॅकडाऊन, संचारबंदी यासह विविध कठोर निर्बंध लावले होते.

कोरोनाच्या अत्तापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या, दुसऱ्या लाटेने सर्वाधिक विध्वंस घडवून आणला. तिसरी लाट सौम्य ठरली. आता राज्यात बहुतांश भागातून कोरोना हद्दपार झाला आहे. बोटावर मोजण्याइतकेच कोरोनाचे रूग्ण राज्यात सक्रीय आहेत. अश्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना निर्बंध हटवावेत ही मागणी जोर धरत होती.

अखेर ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याबाबत ट्विट करण्यात आले आहे.

मंत्री आव्हाड यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले, गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्सहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.

राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आल्याने जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गुढी पाडव्याची राज्यातील जनतेला ठाकरे सरकारकडून मोठी भेट देण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे.

उद्यापासून राज्यात मास्कची सक्ती असणार नाही, ज्यांना मास्क लावायचे आहेत त्यांनी लावावेत, ज्यांना वापरायचे नाहीत त्यांनी वापरू नयेत असाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आहे.