Gudi Padwa 2022 | कर्जत – जामखेड मतदारसंघातील ‘या’ गावांमध्ये उभारली जाणार श्रमदानाची गुढी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Gudi Padwa 2022 | कर्जत जामखेड मतदारसंघात समृद्ध गाव संकल्प 2.0 या योजनेचा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दणक्यात प्रारंभ होणार आहे. या योजनेत मतदारसंघातील 28 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षापासुन आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांच्या पुढाकारातून मतदारसंघात समृद्ध गाव योजना गतिमान करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरूवात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रमदानाची गुढी उभारून केली जाणार आहे.

या योजनेत कर्जत तालुक्यातील 14 व जामखेड तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. आध्यत्मिक, शिक्षण, महिला व बालविकास, जल संधारण, वृक्ष लागवड, मूलभूत सुविधा, आरोग्य अशा 7 विषयांवर लोक सहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने ग्राम समृध्दीचा संकल्प पुढे नेला जात आहे.

28 गावात श्रमदानाची गुढी

गुढी पाडव्याचे औचित्य साधून, समृद्ध गाव संकल्प 2.0 मधील बारामतीमध्ये साडेतीन दिवसीय ट्रेनिंग घेतलेले 28 गावं यात सहभागी होणार आहेत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिथे श्रमदान करायचे तिथे गुढी उभारायची आहे. या गुढीला गावात समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करत श्रमदान करायचे आहे.या योजनेत सहभागी झालेली गावे वर्षभर श्रमदान करणार आहेत.

समृद्ध गाव योजनेच्या 2.0 उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र पवार, सुनंदा पवार, व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी गुढीपाडवा दिनी करणार आहेत.

समृद्ध गाव संकल्प 2.0 मध्ये खालील गावांचा सहभाग

जामखेड – डोणगाव, पाडळी, मोहा, कोल्हेवाडी, नाहुली, देवदैठण, राजुरी, पिंपळगाव आळवा, लोणी, वाकी, जातेगाव, दिघोळ, मुंगेवाडी, जायभायवाडी.

कर्जत – भांबोरा, बारडगाव दगडी, बेनवडी, कोळवडी, वडगाव तनपुरा, कोपर्डी, भोसे, खांडवी, चांदे बुद्रुक, कोंभळी, घुमरी, टाकळी खांडेश्वरी, आखोनी, डोबाळवाडी