लम्पी आजाराबाबत पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रातील पशुधनांमधे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. राज्यातील पशुधन संकटात सापडले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास जनावरांच्या मृत्यूबरोबरच दुध उत्पादन मोठी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लम्पी आजाराचा फैलाव रोखण्यासंदर्भात राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil's big announcement about lumpy disease

राज्याचे  महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेतला.अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांना लम्पी चर्मरोगाचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यावर करावयाची उपाययोजना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना विखे यांनी राज्यातील सर्व जनावरांच्या लसीकरण करण्याची मोठी घोषणा केली. तसेच राज्यामध्ये पशुधन बाजारासह वाहतुकीवर बंदी असणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil's big announcement about lumpy disease

यावेळी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपस्थित होते.

प्रोटोकॉलची सक्तीने अंमलबजावणी करा – विखे

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थितीचा आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून बाधित जनावरांवर प्रभावी उपचार करावे. यासाठी विभागाने निर्गमित केलेल्या प्रोटोकॉलची सक्तीने अंमलबजावणी करावी तसेच प्रोॲक्टीव्ह कार्य करावे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना मंत्री विखे यांनी केल्या.

Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil's big announcement about lumpy disease

राज्यामध्ये पशुधन बाजारासह वाहतुकीवर बंदी

खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक लम्पी आजाराच्या उपचारावर शेतकऱ्यांची लूट करत असून अवाजवी खर्च करण्यास भाग पाडत आहे, ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हायला हवे.  या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्यामध्ये पशुधन बाजारावर बंदी घालण्यात आली असून, जिल्हा आणि राज्यात पशुधनाची वाहतूक बंद करण्यात आल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

जनावरांचे लसीकरण, गोठे, ओटे याठिकाणी औषधांची फवारणी प्राधान्याने करण्यात यावी.  तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी विखे यांनी दिले.

औषधांचासाठा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, तसेच त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन युध्द पातळीवर काम करावे अशी सूचना त्यांनी केली. खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घ्यावी  तसेच जिल्हा व तालुका स्तरावर या आजारावरील पुरेसा औषधांचा साठा शासनातर्फे तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil's big announcement about lumpy disease

प्रभावी प्रतिजैविकांचा उपयोग करावा – सुजय विखे

खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, यापूर्वी लम्पी रोगाचा सामना शेतकरी व प्रशासनाने केला नव्हता, परंतु कोविड आजारावरील उपचारावेळी अंमलात आणलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन या  रोगावर नियंत्रण आणावे, आवश्यकतेनुसार प्रभावी प्रतिजैविकांचा उपयोग करावा अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, जनावरांच्या या आजाराबाबत तालकास्तरावर विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

जनावरांच्या उपचारासाठी जास्तीचा वेळ द्यावा – आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की, लम्पी रोगाचे गांभीर्य ओळखून, पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जनावरांच्या उपचारासाठी जास्तीचा वेळ द्यावा. तसेच ज्या तालुक्यात या रोगाचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणच्या जनावरांचे ७२ तासात लसीकरण पूर्ण करावे, असे सिंह यांनी निर्देश दिले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात पशुधनाची संख्या जास्त असल्याने, जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करावे अशी सूचना त्यांनी केली.जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुमरे,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर यांनी बैठकीच्या सुरूवातीला उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.