तीन वर्षांत तुम्हाला जे जमलं नाही,ते आम्ही पाच महिन्यांत करून दाखवलं, भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडेंनी राष्ट्रवादीला ठणकावले !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार राम शिंदे यांनी 250 कोटीची पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना मंजूर करून आणल्यानंतर जामखेडमध्ये श्रेयवादाची लढाई तीव्र झाली आहे. पाणी योजनेवरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने- सामने आले आहेत. दोन्हीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या दाव्यांची हवा गुल करण्यासाठी भाजपा आता आक्रमक झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीवर थेट हल्ला चढवला आहे. तुम्हाला तीन वर्षांत जे जमलं नाही, ते आम्ही पाच महिन्यांत करून दाखवलं,असे म्हणत बिभीषण धनवडे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे.

What you couldn't do in three years we have done in five months, BJP's city president Bibhishan Dhanwade slammed the NCP,

तत्वता: मंजुरीला काहीही किंमत नाही, असे राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत आहेत, परंतू जामखेडला उजनीहून पाणी योजना असावी,असा पहिला विचार राम शिंदे साहेबांच्या मनात आला, त्यादृष्टीने काम सुरू झाले, याला जास्त किंमत आहे. योजनेचा पहिला प्रस्ताव शिंदे साहेबांच्याच काळात झाला आणि मंजुरीही त्यांनीच आणली. त्यामुळे या योजनेचे खरे श्रेय आमदार राम शिंदे यांचेच आहे असे धनवडे यांनी ठणकावून सांगितले.

मध्यंतरीच्या काळात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मागील तीन वर्षांत रोहित पवारांना पाणी योजना का मंजुर करता आली नाही? आता पाच महिने झाले आमची सत्ता आलीय, या काळात आमचे नेते राम शिंदे साहेबांनी पाणी योजना मंजूर करून दाखवली, मग हीच प्रशासकीय मंजुरी रोहित पवारांना तीन वर्षांत का करता आली नाही ? असा रोकडा सवाल करत शहराध्यक्ष बिभीषण धनवडे यांनी आमदार रोहित पवारांवर हल्ला चढवला.

धनवडे पुढे म्हणाले की, जामखेडमध्ये सुरु असलेल्या सगळ्या योजना आमदार राम शिंदे हे मंत्री असतानाच्या आहेत, रोहित पवार यांनी मागील तीन वर्षांत फक्त कागदपत्र फिरवा फिरवीचं, कामं प्रलंबित ठेवण्याचं काम केलयं,  रोहित पवारांचा हेतू चांगला नव्हता हे आता स्पष्ट होतयं,आमदार राम शिंदे साहेबांना श्रेय जावू नये म्हणून त्यांची तीन वर्षे धडपड सुरू होती, जामखेडच्या जनतेला गेली तीन वर्षे पाणी योजनेपासून दुर ठेवण्याचे काम रोहित पवारांनी केलं आहे.

शेवटी तुम्ही किती जरी कालवा केला, किती जरी ओरडू ओरडू सांगितलं हे आम्हीच केलं हे आम्हीच केलं, परंतू लोकांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत, तुमच्या भूलवा भूलवीला जनता आता बळी पडणार नाही, पुर्वी जे नगरसेवक आमच्याकडे होते,ते आता त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांना पाणी योजनेची सर्व वस्तुस्थिती माहित आहे, त्यामुळे ते यावर काहीही बोलत नाहीत. अशी खोचक टीका धनवडे यांनी केली.

जामखेड पाणी योजनेविषयी अधिक माहिती देताना शहराध्यक्ष बिभीषण धनवडे पुढे म्हणाले की, सन 2019-20 च्या सुधारित दरपत्रकानुसार 9 जुलै 2019 रोजी 115 कोटी 91 लाखाची सुधारित तांत्रिक मंजूरी मिळाली होती,आमदार राम शिंदे  हे मंत्री असताना या योजनेला मंजुरी मिळाली होती, या योजनेच्या तांत्रिक तपासणी अंतर्गत 1 टक्का शुल्कापोटी 1 कोटी 23 लाख 19 हजार 514 रूपये शासनाला 11 जुलै 2018 रोजी नगर परिषदेमार्फत जमा करण्यात आले होते. त्यावेळी मी पाणी पुरवठा सभापती म्हणून नगरपरिषदेत कार्यरत होतो.

त्यावेळी सर्व टेक्निकल बाजू बघितल्या गेल्या होत्या, पाणीपुरवठ्यासाठी कन्सल्टंट आणि आम्ही सर्व नगरसेवक ज्या ठिकाणी उजनीचं उद्भव आहे त्या ठिकाणी स्वता: गेलो होतो, पाणी पुरवठ्याच्या फिल्टर प्लँटसाठी पाडळी फाट्यावरची माझ्या बहिणीच्या नावावरील जी जागा आहे त्या जागेसंदर्भात आम्ही 100 रुपयाच्या स्टँपवर नगरपरिषदेला नोटरी करून दिली होती, त्यामुळं या योजनेचा आणि रोहित दादा पवारांचा कुठेही लांब लांब संबंध नाही,अशी टीका धनवडे यांनी केली.

आमदार रोहित पवारांकडून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे, जामखेड पाणी योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वी (13 नोव्हेंबर 2021) करण्यात आले होते. मग गेल्या वर्षभरात या योजनेच्या कामाला सुरुवात का झाली नाही ? सदर योजनेला 1 डिसेंबर 2022 ला प्रशासकीय मंजुरी मिळालीय, मग रोहित पवारांनी मागील वर्षी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कसा घेतला ? भूमिपूजनाआधी सदर कामाची वर्क ऑर्डर झाली होती का ? जर वर्क ऑर्डरच नव्हती तर मग भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलाच कसा ? असे प्रश्न उपस्थित करत धनवडे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.

धनवडे पुढे म्हणाले की, संवैधानिक पदावरील मंत्र्यांच्या हस्ते पाणी योजनेचे भूमिपूजन करूनही ही योजना रोहित पवारांना सुरू करता आली नाही, याचा अर्थ कर्जत-जामखेडमधील जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे. जामखेडची पाणी योजना मंजुर नसताना या योजनेचे भूमिपूजन करण्यामागे आमदार रोहित पवारांचा उद्देश साफ नसल्याचे यातून दिसून येत आहे. असाही टोला धनवडे यांनी लगावला.

जामखेड पाणी योजनेवरून राष्ट्रवादीच्या नेत्याने पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता, याला उत्तर देताना धनवडे म्हणाले की, एका व्यक्तीने पत्रकार परिषद घेत आमदार राम शिंदे साहेबांचा ऐकेरी भाषेत उल्लेख करत त्याची आणि त्याच्या नेत्याची जी काही संस्कृती आहे ती दाखवून दिली, स्वता: मात्र ग्रामपंचायत सदस्य नसताना आणि कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नसताना स्वता:ला नेता समजणार्‍या व्यक्तीने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सोशल मिडीयावर जोरात चालू केलं आहे असे टीकास्त्र धनवडे यांनी सोडले. यातून राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश आजबे यांचे नाव न घेता धनवडे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.