जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। नुकताच नवरात्रोत्सव संपला. तसा हा खास महिला वर्गाचा महत्वाचा उत्सव. याकाळात देवीची अराधना करत महिला वर्ग उपवास धरतात. जामखेड तालुक्यात विविध उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या नवरात्रोत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यंदाचा नवरात्रोत्सव गाजवला तो जामखेडमधील राष्ट्रवादीचे युवा नेते महेंद्र राळेभात यांच्या शिवक्रांती मित्र मंडळाने.

जामखेड शहरातील शिक्षक काॅलनीमध्ये शिवक्रांती मित्र मंडळाकडून नेहमी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रवादीचे युवा नेते महेंद्र राळेभात यांच्या संकल्पनेतून आरतीताई राळेभात यांच्या नेतृत्वाखाली शिवक्रांती मित्र मंडळाने यंदा नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कुटुंबाचा गाडा हाकत संसारात रमणाऱ्या बायका आणि मुलींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्यासाठी आरतीताई राळेभात यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली सलग 9 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगित खुर्ची, दांडिया, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लोकगीत स्पर्धा, यासह आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमांना महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांच्या अंगी असणारे सुप्त कला गुण हरवून जातात. परंतू याच सुप्त कलागुणांना पुन्हा जागृत करून महिलांना आपली आवड जोपासता यावी, आनंदमयी जीवनाचा खरा आनंद अनुभवता यावा, यासाठी आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन करतो,यंदाच्या नवरात्रोत्सवात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला, शिक्षक काॅलनी परिसर हे आमचे कुटूंब आहे. कुटूंबाला आनंद देण्यासाठी यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते अशी भावना आरतीताई महेंद्र राळेभात यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, यंदा कोरोना महामारीनंतर सर्वच सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होत आहे.यंदा गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जामखेडमध्ये अनेक मंडळांनी नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यात सर्वाधिक चर्चा झाली ती महेंद्र राळेभात यांच्या शिवक्रांती मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाची.
या मंडळाला सर्वाधिक महिलांचा प्रतिसाद मिळाला. मोठ्या ऊर्जादायी वातावरणात महिला आणि मुलींनी मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आनंद लुटला. आरतीताई आणि महेंद्र राळेभात यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव शिवक्रांती मित्र मंडळाने गाजवला.