जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमाचे जामखेड नगरपरिषद हद्दीत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जामखेड शहरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.
भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायमस्वरूपी रहावी या उद्देशाने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. जामखेड शहरात सुध्दा हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यादृष्टीने जामखेड नगर परिषदेने जय्यत तयारी केली आहे.
जामखेड शहरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेकडून जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. हर घर तिरंगा उपक्रम 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत पार पडणार आहे. या काळात जामखेड नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांवर तसेच सर्व शासकीय/ खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी. सदर ध्वज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी आपापल्या इमारतीवर, घरांवर फडकविण्यात यावा व तो दिनांक 15 ऑगस्ट रोजी 2022 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता उतरविण्यात यावा असे अवाहन जामखेड नगरपरिषदेेकडून करण्यात आले आहे.
शासनामार्फत नगरपरिषदेला ध्वज प्राप्त झालेले आहेत. या ध्वजांची विक्री नगर परिषदे मार्फत वेगवेळ्या ठिकाणी स्टॉल लावून करण्यात येणार आहे.
तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. तरी सर्वांनी आपण आहात त्या ठिकाणी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताचे गायन करावे असे अवाहन जामखेड नगरपरिषदेेकडून करण्यात आले आहे.