विविध मागण्यांसाठी जामखेडमध्ये उपोषण सुरु

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : विविध मागण्यांसाठी घोडेगाव येथील प्रभू नवनाथ गवळी हे जामखेड येथील जून्या तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.

घोडेगाव येथील गवळीवस्ती पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात यावे. घोडेगाव येथील वार्ड क्रमांक 1 मधील अंगणवाडीचे काम पुर्ण करावे. जिजामाता विद्यालयात 2018 पासून 2 शिक्षक नाहीत, या ठिकाणी त्वरीत शिक्षकांची नेमणूक व्हावी, शाळेत विद्यार्थ्यांसाठी शौचालयांची उभारणी व्हावी, तसेच ग्रामसभेत वारंवार मागणी करूनही घरपट्टी व पाणीपट्टीचा हिशोब दिला जात नाही तो द्यावा तसेच पाणंद रस्त्याच्या कामांची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी प्रभू नवनाथ गवळी यांनी उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे.

या अंदोलनास प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे. यावेळी शाखा उपाध्यक्ष बाबू राजेंद्र भोंडवे, नय्यूम सुभेदार, भिमराव पाटील, जालिंदर कल्याण भोंडवे, सागर नाना भोंडवे, जुनेद इकबाल सय्यद, शायद वजीर सय्यद, राम सूर्यभान भोंडवे, सुभाष बापू भोंडवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला आहे.