जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जामखेड नगरपरिषद प्रारूप विकास योजनांच्या जमीन वापर नकाशात आरक्षण ठेवावे, अशी मागणी जामखेड शहरातील शिवप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना देण्यात आले आहे.
प्रारूप विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठीची प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत,याच अनुषंगाने २२ डिसेंबर रोजी शहरातील शिवप्रेमींनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन देत खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगरपरिषद विकास योनजेचे काम प्रगतीपथावर असून विद्यमान जमिन वापर नकाशा नगरपरिषद कार्यालयास सुपूर्द ( हस्तांतरीत ) करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत प्रारुप विकास योजना तयार करताना शहराच्या दृष्टीने प्रस्तावित जमिन वापर नकाशात आरक्षणे प्रस्तावित करणे आवश्यक असल्याने तसेच प्रारुप विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा यांचा सहभाग मिळावा या करिता दि. २०/१२/२०२२ रोजी जामखेड नगरपरिषद व सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर यांचे कडील संयुक्त विद्यमाने आपण बैठक आयोजित केलेली होती.
त्यानुसार जामखेड शहरातील खर्डा चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणे करीता खर्डा चौकात जागा (जमीन) आरक्षित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शेकडो शिवप्रेमींच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रत नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक, खा. सुजय (दादा) विखे, आ. रोहित पवार, आ. प्रा. राम शिंदे यांनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरातील शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.