RR vs LSG Match Today : संजु सॅमसनची तुफानी फटकेबाजी, राजस्थान राॅयल्सने उभारला धावांचा डोंगर, लखनऊ सुपर जायंटसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य !
RR vs LSG Match Today : राजस्थान राॅयल्सने लखनऊ सुपर जायंटसमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संजू सॅमसनने या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत सर्वाधिक 82 धावा केल्या.52 चेंडूचा सामना करताना संजूने 6 गगनचुंबी षटकार आणि चार चौकार मारत 82 धावा चोपल्या.त्याने रियान पराग सोबत तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे राजस्थान मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरले.
आयपीएलच्या 17 व्या सिजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. राजस्थान राॅयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट यांच्यात सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्सने फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 82 धावा गेल्या. त्यानंतर रियान परागने 29 चेंडूत 43 धावा चोपल्या
त्याचबरोबर ध्रुव जुरेल यानेही फटकेबाजी केली. त्याने 12 चेंडूत 20 धावा केल्या. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने 12 चेंडूत 24 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. जो बटलर हा स्वस्तात बाद झाला त्याने 11 धावा केल्या. त्यानंतर संजु सॅमसन आणि रियान पराग यांनी संघाचा डाव सावरला.
संजु सॅमसन आणि रियान पराग यांनी 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाची पडझड रोखली आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली. राजस्थानने चार विकेट्सच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. लखनऊ समोर राजस्थानने विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवले आहे.