राम शिंदेच्या राजकीय मैदानात पडळकरांची जहरी ‘पेरणी’ ; कुणाच्या फायद्याची ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख ) : “वादग्रस्त व आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना ‘शेलक्या’ भाषेत टार्गेट केले. यासाठी त्यांनी भाजपा नेते राम शिंदे यांच्या कर्जत – जामखेड या राजकीय मैदानाचा वापर केला. पडळकर यांनी केलेली वादग्रस्त शाब्दिक ‘पेरणी’ भाजपच्या फायद्याची की राष्ट्रवादीच्या याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.” (MLA Gopichand Padalkar, who is known for his controversial and aggressive statements, once again targeted Rohit Pawar. He used BJP leader Ram Shinde’s Karjat-Jamkhed political arena for this)

भाजपाचे विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे नुकतेच कर्जत – जामखेड तालुक्याच्या दौर्‍यात आले होते. बहुजन समाज संवाद दौर्‍यात त्यांनी धनगरबहूल भागात भेटीत देत साधलेला संवाद चर्चेचा ठरला आहे. पडळकरांनी या दौर्‍यात शरद पवार, रोहित पवार व महाविकास आघाडी सरकार विरोधात विखारी शब्दांत टीकास्त्र सोडत पुन्हा एकदा या भागातील राजकीय वातावरण तापवले आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

“आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजण्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. आ.रोहित पवार हे पोस्टरबॉय आहेत. ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय असतात. मतदारसंघातील रस्ते खराब झालेले आहेत तिकडे लक्ष द्यावे. माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजूर केलेली कामेच अद्यापपर्यंत सुरू असून, त्यांच्याच कामाचे श्रेय ते घेत आहेत. ‘काम करायला कधी कधी आणि श्रेय घ्यायला सर्वात आधी’ अशी त्यांची परिस्थिती आहे.बारामती ॲग्रोच्या माध्यमातून निकृष्ट खाद्य कोंबडी पालकांना दिले. त्यामुळे कोंबड्या अंडे देत नाहीत, म्हणजे पवारांनी कोठेही पेरले तर तिथे घोटाळा उगवणार हे बारामती ॲग्रोमुळे सिध्द झाले आहे. आघाडी सरकारमध्ये कोण काय करतोय काहीच कळत नाही, अशी टीका भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.

रोहित पवारांचा पडळकरांवर पलटवार

गोपीचंद पडळकरांचा राजकीय जन्मच पवारांवर टिका करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी पक्षाने बुदा त्यांना आमदारकी बहाल केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी ते उत्तम पार पाडत आहेत. हे करत असताना त्यांनी विकास कामेही पहावेत. उठसूठ टिका करून चर्चेत राहतात. ते बहुजन समाजाचे संघटन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत परंतू  ज्या पक्षाने मंडल आयोगाला कडाडून विरोध केला त्याच पक्षात ते आहेत असा पलटवार करत रोहित पवारांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला.

पडळकर विरूध्द पवार वादात फायदा कुणाचा ?

कर्जत – जामखेड या मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांच्या राजकीय मैदानात आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाढता वावर अनेक तर्क-वितर्कांना जन्म घालणारा आहे. पडळकर हे सातत्याने पवारांविरोधात जहरी टिका करायची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच रोहित पवारांना सातत्याने डिवचून प्रसिध्दी मिळवत आहेत की भाजपसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत. जर पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा विचार पडळकरांचा असेल तर मग राम शिंदे व पडळकर हे दोन्ही नेते एकत्रपणे मतदारसंघ का पिंजून काढत नाहीत ? राम शिंदेंच्या मतदारसंघात जाऊन पवार विरोधी जहरी टिकेची राजकीय पेरणी करून पडळकरांना स्वता:च्या पक्षात ओबीसी नेतृत्व म्हणून तर प्रस्थापित व्हायचे नाही ना ?  पक्षातील कुणाच्या तरी इशाऱ्यावर पडळकर हे कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे यांच्या विरोधात राजकीय वातावरण तर तयार करू पाहत नाहीत ना ? असे अनेक प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.  दरम्यान गोपीचंद पडळकर विरूध्द रोहित पवार या वादात हकनाक राम शिंदे यांची कोंडी होत असल्याचे आता दिसू लागले आहे. राम शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पडळकरांभोवती कालच्या दौर्‍यात टाकलेला गराडा राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.