कर्जत – जामखेड मतदारसंघातही दामदुप्पट योजनेचे पिक जोमात; करोडोंची गुंतवणूक, फसवणूक होण्याआधी सावध व्हा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कमी श्रमात जास्त पैसा मिळवण्याच्या लोभापायी सध्या अनेक जण आकर्षक आर्थिक योजनांमध्ये पैश्यांची गुंतवणूक करताना दिसत आहेत. अश्याच एका योजनेची सध्या कर्जत – जामखेड मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.या योजनेत साधारणतः 500 कोटींच्या आसपास गुंतवणूक झाल्याचे बोलले जात आहे.सध्या दामदुप्पट योजनेत फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. फसवणूक होण्याआधी सावध व्हा अन्यथा मोठा चुना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक लाख रुपये भरले की 45 दिवसानंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये व्याज मिळणार आणि 36 महिने झाल्यावर मूळ मुद्दल (एक लाख) परत मिळणार, 36 महिन्यात रक्कम दामदुप्पट करणार्‍या या योजनेने कर्जत – जामखेड मतदारसंघात धुमाकूळ घातला आहे.

महागड्या गाड्यांमधून गावोगावी जाऊन लोकांना योजना समजावून सांगण्याचे उद्योग वाढले आहे. प्राथमिक माहितीनुसार कर्जत – जामखेड या दोन्ही तालुक्यातून सुमारे 300 ते 500 कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. ही गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही.

गावा गावातून गुंतवणूकीचे कोटीचे उड्डाणे

कामधंदा सोडून लोक यात गुंतवणुकीसाठी जीवाचा आटापिटा करू लागले आहेत. एखाद्या गावातूनही दीड-दीड, दोन – दोन कोटी रूपयांची गुंतवणूक या योजनेत झाली आहे अशी चर्चा आहे. मुख्यता: या योजनेत राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, व्यावसायिक, चांगली आर्थिक क्षमता असलेले शेतकरी यांनी या योजनेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. काहींनी तर कर्ज काढून दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवले आहेत तर काहींनी मालमत्ता विकून पैसे गुंतवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.

गाड्यांचे आमिष

आज या गावातील अमूकला गाडी मिळाली, आज त्या गावात तमूकला गाडी मिळाली अश्या कहाण्या रंगवून हवा निर्माण केली जात आहे. लोक याला भूलून लगेच गुंतवणूकीसाठी पुढे येत आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघात सुरू असलेला आर्थिक फसवणुकीचा हा गोरखधंदा वेळीच रोखून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. भविष्यात होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचण्यासाठी जनतेनेही भूलथापांपासून सावध राहणे आवश्यक आहे.

दुबईला ऑफीस आणि बरचं काही

सदर योजनेत जनतेची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढावी यासाठी सदर दामदुप्पट योजनेचे एजंटकडून कंपनीचा दुबईत व्यवसाय आहे. स्वता:चे ऑफीस आहे असे भासवले जात आहे. तसेच अनेक आमिषे दाखवली जात असल्याची माहिती आहे.

योजना नक्की काय आहे ?

एक लाख रुपये भरले की 45 दिवसांनी दरमहा 3 हजार रुपये व्याज सुरु.

दरमहा व्याज 36 महिने मिळणार

मूळ मुद्दल 1 लाख रुपये पुन्हा 36  महिन्यानंतर परत मिळणार.

कंपनीसाठी ब्रोकर म्हणून 15 लाख गुंतवणूक मिळवून दिल्यास 6 लाखांपर्यंतची गाडी लगेच मिळणार, ती गाडी आपल्या नावावर घ्यायची, परंतु त्याचे व्याज व कर्जाचे हप्ते संबंधित कंपनी देणार.

वस्तुस्थिती काय सांगते..

जगात आज अशी एकही बँक किवा वित्तीय संस्था नाही की ती 36 महिन्यात दामदुप्पट रक्कम देऊ शकेल. आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला त्याचा फायदा मिळवून देतो, असे सांगण्यात येते. परंतु, शेअर मार्केटमध्ये मागच्या 40 वर्षात कधीच जास्तीत जास्त 16.50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळालेला नाही. त्यामुळे नवी गुंतवणूक थांबली की या योजनेचा फुगा फुटेल. मात्र तोवर वेळ गेलेली असेल.

कष्टाचा पैसा वाया घालवू नका

कर्जत- जामखेड मतदारसंघ दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी काबाडकष्ट करून जगत आलेला आहे. मुलांचे शिक्षण, घर प्रपंच आणि शेती यासाठी पै पै जमवून बळीराजा राबत आलेला आहे. कष्टातून मिळवलेला हा पैसा बोगस आर्थिक योजनेच्या आमिषाला बळी पडून गुंतवू नका. आकर्षक योजनेच्या नादी लागू नका. यापूर्वी देशात अनेक योजनांमधून अनेकदा फसवणूकी झाल्या आहेत. कष्टाचा पैसा वाया घालवू नका.

आर्थिक फसवणुकीचा गोरखधंदा राज्यात सक्रीय

दाम दुप्पटीचे आमिष दाखवून अनेक योजनांद्वारे कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्याचे प्रकार सध्या राज्यभरातून उघडकीस येऊ लागले आहेत, कोल्हापूर,औरंगाबाद येथील प्रकरण ताजे असतानाच गेल्या दोन दिवसांपासून बार्शीतील प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात विशाल फटे या तरुणाने बार्शी व सोलापूर तसेच राज्याच्या काही भागातील नागरिकांना 2000 कोटींचा गंडा घातल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कडकनाथ प्रकरण

2019 मध्ये कडकनाथ कोंबडी नावाने गुंतवणूक करणा-या महारयत ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 4 राज्यातील लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली म्हणून चर्चेत आली होती. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी म्हणून आम्ही कंपनीच्या इस्लामपूर येथील रजिस्टर पत्यावर नोटीस पाठवली मात्र त्याठिकाणी फक्त मोकळी जागा असल्यामुळे नोटीस परत आली असे ॲड विकास शिंदे म्हणाले.

गोरगरीबांचे संसार उध्वस्त होण्याआधीच…

आर्थिक गुंतवणूकीवर प्रमाणापेक्षा जास्त परतावा देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या लोकांना गंडा घालण्याच्या उद्देशाने सुरुवाती पासूनच सर्व नियोजन करत असतात अशा अनेक कंपन्यांंनी आजपर्यंत लोकांची फसवणूक केली आहे. तरीही वारंवार लोक अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना आणि पुन्हा पुन्हा फसतात. पोलिसांची याबाबत महत्वाची भूमिका आहे. मात्र, फसवणुक करणारे लोक खुप चालाख असतात, ते पोलिसांसोबतच असो अथवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी, अधिकारी यांच्यासोबत फोटो घेतात आणि सर्वांना तेच फोटो दाखवत विश्वास संपादन करुन गुंतवणूक करुन घेतात. लोकांना गंडा घालून गायब झाल्यानंतर पोलिस जागे होतात मात्र हातात काहीच नसते. पोलिसांनी अशा कंपन्यांची वेळीच माहीती घेऊन लोकांची कोटींची होणारी फसवणूक थांबवणे गरजेचे आहे. अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्ते ॲड विकास शिंदे यांनी केली आहे.