विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक निर्णय, कोल्हापुरातील हेरवाड गावाने उचलले क्रांतिकारी पाऊल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणारी ऐतिहासिक घटना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी ठराव ग्रामसभेत केला आहे. या निर्णयामुळे संपुर्ण महाराष्ट्रात हेरवाड गाव प्रकाशझोतात आले आहे.

पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगड्या फोडल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, सती प्रथा बंद झाली मात्र विधवा झाल्यानंतरच्या प्रथेमुळे सन्मानाने जगण्याच्या हक्कावर गदा येत असल्याने विधवा महिलांची कुचंबणा होते. याच अनिष्ट रूढीला तिलांजली देण्याचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी निर्णय शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला.

विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत संमत केला आहे. सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गावसभेत हा ठराव संमत करण्यात आला.या ठरावाच्या सुचक मुक्ताबाई संजय पुजारी ह्या असून सुजाता केशव गुरव यांचे अनुमोदन आहे.

राजर्षी शाहू छत्रपतींची स्मृती शताब्दी होत असताना कोल्हापूरने राजर्षींचा पुरोगामी वारसा कृतिशीलपणे पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येेथील ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे.

या निर्णयामुळे विधवा प्रथेचा प्रश्न राज्यात नव्याने चर्चेत आला असून हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी करून विधवा महिलांची जाचक अश्या रूढी परंपरेतून सुटका करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.