जमीन वाद व त्रासाला कंटाळून दरडवाडीतील एकाने संपवली जीवनयात्रा, आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओ, दोघांवर गुन्हा दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीन हडपण्याचा प्रयत्न आणि शेतातील विजेच्या पोलवरून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या एका इसमाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. विकास साहेबराव रणसिंग (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी मृत विकास यांनी व्हिडिओ तयार करत दोघांची नावं घेतले होते. त्याआधारे खर्डा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास दरडवाडी येथील रणसिंग वस्तीवर विकास साहेबराव रणसिंग यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही बाब त्यांची बहीण सुवर्णा पौडमल व पत्नी विद्या रणसिंग यांच्या निदर्शनास आली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खर्डा येथील लाड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोबाईलमधील व्हिडिओमुळे घटना उघडकीस
मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर, मृत विकास यांची पत्नी विद्या रणसिंग यांनी पतीचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईलच्या गॅलरीत विकास यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ त्यांना आढळून आले. या व्हिडिओमध्ये विकास यांनी स्पष्ट केले होते की, महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) याने त्यांची ६ गुंठे जमीन बळकावली असून ती परत देण्यास नकार दिला होता. तसेच काही महिन्यांपूर्वी महादेव दराडे याने मारहाणही केली होती. याशिवाय, शेजारी शेत असणारा चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) हा शेताच्या बांधावरून आणि विजेचा पोल नेण्याच्या कारणावरून विकास यांना सतत धमक्या देत होता. याच त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवली असे फिर्यादीत म्हटले आहे.
दोघांवर खर्डा पोलिसांत गुन्हा
महादेव गोवर्धन दराडे व चतुर्भुज दाताळ या दोघांच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळूनच पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पत्नी विद्या विकास रणसिंग यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून खर्डा पोलिसांनी १) महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) आणि २) चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) या दोघांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस ठाण्यात तणाव, उपविभागीय अधिकाऱ्यांची धाव
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत विकास रणसिंग यांचा मृतदेह खर्डा पोलीस स्टेशनला आणण्यात आला. यावेळी पोलिस स्टेशनला मोठा जमाव जमला होता.काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी तातडीने खर्डा पोलीस ठाण्याला भेट दिली आणि त्यांनी नातेवाईकांची समजुत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हा दाखल झाल्यानंतर जमाव शांत झाला आणि वातावरण पूर्वपदावर आले.
मयताची पत्नी विद्या रणसिंग यांच्या फिर्यादीवरून महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) आणि चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पीएसआय अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.