जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील कलाकेंद्र चालक राहुल अंधारे हल्ला प्रकरणात जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी आष्टी येथून बेड्या ठोकल्या आहेत. अमोल आबा पिसाळ आणि हरी बेद्रे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून न्यायालयाने दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कान्होपात्रानगर परिसरातील राहुल हिरामण अंधारे (वय ३४) या कलाकेंद्र चालकावर पंचायत समिती परिसरातील पुढारी वड या चहाच्या हाॅटेलमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून अंधारेंचा हात मनगटापासून तोडला होता. या हल्ल्याने जामखेड शहरासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
याप्रकरणी रुग्णालयात जखमीचा जबाब नोंदवून जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध सुरू होता. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. भरवस्तीत घडलेल्या या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे मोठे अव्हान जामखेड पोलिसांसमोर उभे ठाकले होते.
१९ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी आष्टी परिसरातील एका शेतात लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून १) अमोल ऊर्फ आबा सुदाम पिसाळ (वय ३६, रा. पिसाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) आणि २) श्रीहरी मुकुंद बेदरे (वय २६, रा. राम मंदिर गल्ली, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघा आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बेल्हेकर, दत्तू बेलेकर, प्रकाश जाधव आणि गणेश साने यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.