जामखेड: नान्नज रथयात्रेत तरुणावर प्राणघातक हल्ला; “याचा काटाच काढू” म्हणत गुंडांचा धुडगूस, ६ जणांवर गुन्हा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आषाढी रथयात्रा उत्सवाला गालबोट लावणारी एक मोठी घटना नान्नज रथयात्रेत घडलीआहे.डिजे सुरु करण्याच्या वादातून जामखेड शहरातील काही गुंडांनी एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक केला आहे. या गुंडांनी रथयात्रेत मोठा धुडगूस घातला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पाच ते सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jamkhed, Youth attacked with intent to kill during Nannaj chariot procession; goons run amok declaring "we'll finish him off"; case registered against six individuals,

शेकडो वर्षांची परंपरा असलेला नान्नजचा आषाढी रथयात्रोत्सव राज्यात प्रसिध्द आहे. यात्राकाळात गल्लोगल्ली नर्तिकांच्या नाचगाण्यांचे डाव चालतात. २७ रोजी बाजारतळ परिसरात सुरु असलेल्या नर्तिकांच्या नृत्याचा डाव डीजेच्या तालावर सुरू होता. पोलिसांनी शासकीय नियमाप्रमाणे रात्री १० च्या सुमारास डिजे वाजवणे बंद करण्यास सांगत नृत्याचे डाव बंद केले.

त्याचवेळी जामखेडच्या आरोळेनगर भागातील लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर व त्यांच्यासोबत आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांन “डीजे पुन्हा सुरू करा’ अशी मागणी करत अरेरावी सुरू केली.

त्यावेळी इस्माईल शेख या तरूणाने जामखेडच्या तरूणांना समजावून सांगत पोलिसांनी डीजे बंद केले आहेत असे सांगताच संतप्त झालेल्या आरोपींनी इस्माईल शेख याला शिवीगाळ करत दगड, विटा, कोयता, काठ्या व लोखंडी रॉडने मारहाणीस सुरुवात केली.

आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू

त्याचवेळी लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे याने शर्टाच्या आत लपवून ठेवलेला कोयता काढून “आज याला जिवंत सोडायचे नाही, याचा काटाच काढू अशी धमकी देत इस्माईल शेख यांच्या डोक्यावर, तोंडावर व पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तसेच दुसरा आरोपी अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर याने लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतर अनोळखी साथीदारांनी काठ्या व दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली.

दरम्यान गर्दी जमा होताच सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या इस्माईल शेख यांना त्यांचा भाचा आझम पठाण व ग्रामस्थांनी तातडीने उचलून जामखेड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यानंतर हल्लेखोरांनी नान्नज येथील शिवाजी चौकात सुरू असलेल्या दुसऱ्या एका नर्तिकाचा नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन डीजेच्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीवर कोयत्याने वार करून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी इस्माईल मेहमुद शेख यांनी लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे, अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दिली असून, संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर, व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे हे करित आहेत.