जामखेड: कलाकेंद्र चालक राहूल अंधारेवर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला, तिघांवर गुन्हे दाखल, आष्टी कनेक्शन उघड
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील कलाकेंद्र चालक राहूल अंधारे हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून आष्टीतील आरोपींनी अंधारेवर जीवघेणा हल्ला केला आहे. याबाबत तीन जणांविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचे नावे उघड झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

जामखेड शहरातील जामखेड-नगर रस्त्यावरील ‘पुढारी वड’ या चहाच्या हाॅटेलमध्ये राहूल अंधारे हा आपल्या मित्रांसमवेत चहा पीत असताना त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या थरारक हल्ल्यात अंधारेचा हात मनगटापासून थेट वेगळा करण्यात आला होता. या धक्कादायक घटनेने शहर हादरून गेले होते. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
याप्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील दोघांसह एका अनोळखी साथीदारावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा रक्तरंजित थरार घडल्याचे फिर्यादीवरून समोर आले आहे. या हल्ल्यात राहुल हिरामन अंधारे (वय ३४, रा. मिलिंदनगर, जामखेड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यांचा डावा हात मनगटाच्या वरच्या भागातून तुटून पडला असून त्यांच्या छातीवर आणि उजव्या हातावरही कोयत्याने गंभीर वार करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
जखमी कलाकेंद्र चालक राहुल अंधारे याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरु आहेत. राहूल अंधारे याने रुग्णालयातून दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी पुढारी वड या चहाच्या हाॅटेलमध्ये अंधारे व त्याचे मित्र चहा पीत थांबलेले असताना हरी बेद्रे आणि अमोल ऊर्फ आबा पिसाळ (दोघे रा. आष्टी, जि. बीड) हे त्याठिकाणी आले. राहुल अंधारे यांनी यापूर्वी दाखल केलेल्या एका गुन्ह्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हरी बेद्रे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने राहुलच्या डोक्यावर कोयत्याने जोरदार वार केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी राहुलने डावा हात पुढे केला असता, कोयत्याचा घाव थेट हातावर बसल्याने त्याचा हात मनगटाच्या वरून जागीच तुटून खाली पडला. त्यानंतर लगेचच अमोल ऊर्फ आबा पिसाळ यानेही धारदार कोयत्याने त्याच्या छातीवर व उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर दोघे आरोपी त्यांच्या एका अनोळखी साथीदारासह मोटारसायकलवरून पसार झाले.
घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली होती. स्थानिकांनी तातडीने राहुल अंधारे याचा तुटलेला हात पिशवीत घेऊन त्यांना प्रथमोपचारासाठी हलवले. त्यानंतर पुढील उपचारासाठ अहिल्यानगर येथील मॅककेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.